गडचिरोली : शेतकरी (Farmer) पोळ्याचा सण हा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतो. परंतु मागील दोन वर्षे संपूर्ण देशात कोरोनाचा थैमान असल्याने पोळा हा सण शेतकऱ्यांना पाहिजे तसा उत्साहात साजरा करता आला नाही. दोन वर्षांनंतर आतुरतेने वाट बघत यावर्षी नागरिकांनी पोळा सण साजरा करण्यासाठी आशा लावली होती. मात्र पोळ्याच्या दिवशी पोळा न होता दुसऱ्या दिवशी तान्हा पोळ्याला बैलपोळ्याचा सण साजरा करण्यात आला. दुसरीकडे ग्रामीण भागातील ( Rural Area) काही गावांमध्ये पोळ्याच्या दिवशीच लोकांनी बैलांची पूजा करून बैलजोडींना (Bullock Pair) एकत्र करून लोकांच्या घरी नेले. नागरिकांनी बैलांना नैवेद्य घालून उपास सोडून पोळा सण उत्साहात साजरा केला. परंतु कोरची शहरातील पोळ्याच्या दिवशी 26 ऑगस्टला शुक्रवारी बैलांचा पोळा भरविण्यात आलाच नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाले होते.
कोरची तालुका हा छत्तीसगडला लागून असल्याने बहुतांश सण हे बाबूलाल चतुर्वेदी कालनिर्णयाप्रमाणे करण्यात येतात. यावेळी गावातील ज्येष्ठ, प्रतिष्ठितांनी लोकांनी सभा ठेवून बैलपोळा सण दुसऱ्या दिवशी 27 ऑगस्टला शनिवारी मरारटोली येथे मोठ्या उत्साहाने भरविण्यात आला होता. येथील शेतकरी आपल्या बैल मित्रांना शेतीच्या कामाला नेले नाही. बैलांना चांगल्या प्रकारे आंघोळ घातली. त्यांना विविध रंगांनी व विविध प्रकारचे बाशिंग घालून सजावट केली. मरारटोली येथे एकत्र आणले होते. यावेळी कार्यक्रमाची महापूजा राकेश मोहुर्ले यांच्याकडून करून पोळा फोडण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बैलांची पैज स्पर्धा ठेवण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये 135 बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये गौरी चौकातील प्रथम योगेश जमकातन तर द्वितीय मुकेश जमकातन यांनी बैलजोळी पैजमध्ये बाजी मारली. या स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्याला अकराशे रुपये तर द्वितीय येणाऱ्याला सातशे रुपये बक्षीस ठेवण्यात आले. सदर पोळ्याचे नियोजन माळी समाज व गावातील प्रतिष्ठित गावकरी मंडळी मिळून करण्यात आले. यशस्वीतेसाठी मनोज अग्रवाल, नगरपंचायत उपमुख्यधिकारी बाबासो हाके, संतोष मोहुर्ले, श्रीहरी मोहुर्ले, विनोद गुरनुले, केशव मोहुर्ले यांनी सहकार्य केले.