पंढरपूर : शेतामधील उभ्या पिकापासून ते साठवलेल्या धान्यापर्यंत (Untimely Rains) अवकाळी पावसाचा परिणाम हा झालेला आहे. योग्य दराची प्रतिक्षा करीत रब्बी हंगामातील (Onion) कांद्याची साठवणूक शेतकरी करतात. मात्र, या साठवणूकीतल्या कांद्यावरही अवकाळीची अवकृपा झाली आहे. वाळवण्यासाठी ठेवलेला कांदा हा पावसाने भिजला असून त्याला आता जागेवरच कोंभ फुटू लागले आहेत. त्यामुळे अशा कांद्याला 1 रुपया किलो दर (Pandharpur Market) पंढरपूर बाजार समितीमध्ये मिळालेला आहे. त्यामुळे आता विक्रीऐवजी कांदा जागेवरच नासू दिला जात आहे. सर्वात मोठे नगदी पिक असलेल्या कांद्याची ही अवस्था पावसामुळे झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला 20 ते 25 रुपये किलोचा दर मिळत आहे. मात्र, अधिकच्या दर अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली होती. पण पावसाच्या पाण्याने कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेत या कांद्याला केवळ 1 रुपये किलोचा दर मिळत आहे. निसर्गाचा लहरीपणा, बाजार भावातील अनियमितता यामुळे शेती करावी कशी असा सवाल उपस्थित होत आहे.
कांदा हे पिक सुध्दा पावसाप्रमाणेच लहरीचे आहे. कांद्याचे दर रात्रीतून कधी कमी होतील हे सांगता येत नाही तर कधी त्यामध्ये सुधारणा होईल याचा अंदाज व्यापाऱ्यांना देखील बांधता येणार नाही. आता दिवसांपासून सोलापूर बाजार समितीमध्ये बापू कवाडे या शेतकऱ्याने 1123 किलो कांदा विकून या बदल्यात 1665 रुपये मिळाले होते. हमाली, कडता, वाहतूक खर्च वगळता त्यांच्या हातामध्ये केवळ 13 रुपये शिल्लक राहिले होते. त्यांच्या या कांदा विक्रीची पावता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
उन्हाळी कांद्याला मागणी होती. शिवाय खरिपातील कांदा बाजारपेठेत येण्यास अजून आवधी होता. त्यामुळे मागणीच्या जेमतेमच पुरवठा होत असल्याने कांद्याला 20 ते 30 रुपये किलोचा दर होता. मात्र, अचानक झालेल्या पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कधी बाजारातील अनियमितता तर कधी निसर्गाचा लहरीपणा याचा फटका मात्र, शेतकऱ्यांनाच सहन करावा लगत आहे. त्यामुळेच कांद्यालाही हमीभाव देण्याची मागणी शेतकरी करु लागले आहेत.