नंदूरबार : जून महिना संपला तरी पाऊस नाही तर दुसरीकडे पपईवर येणाऱ्या रोगांनी शेतकरी त्रस्त आहे. यामुळे नंदूरबारच्या एका शेतकऱ्याने 6 एकरवरील पपईच्या बागेवर कोयता चालवला. वासुदेव महादेव पाटील असं पपईच्या बागेवर कोयता चालवलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. (Papaya Damage Due To Outbreaks of diseases In nandurbar)
नंदुरबार जिल्ह्यात संपूर्ण जून महिना कोरडाठाक गेल्याने त्रस्त असलेल्या बळीराजाला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांची गत दुष्काळात तेरावा महिना अशी झाली आहे. उन्हाळ्यात लागवड केलेल्या पपई बागांवर रोग आल्याने पपईच्या बागा काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
शहादा तालुक्यातील रायखेड शिवारातील शेतकरी वासुदेव महादेव पाटील यांनी पपई पिकावर मोझाईक रोग आल्यामुळे आपल्या 6 एकर क्षेत्रातील पपई कापून फेकून दिली आहे. दरवर्षी पपई पिकावर नवीन नवीन रोग येत असतात. या रोगांवर महागडी औषधे फवारणी करून देखील त्याचा फायदा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागतं.
वासुदेव पाटील यांनी एप्रिल महिन्यात साडे पाच हजार रोपांची लागवड केली होती. रोपांना जगण्यासाठी रासायनिक खतांबरोबर इतर खर्च केला होता. परंतु तीन महिन्यानंतरही पपई पिकांवर मोझाईक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने टाकलेला पैसा परत निघतांना दिसत नसल्याने शेतकऱ्यांने संतापून पपईची झाडं कापून टाकली.
नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपईची लागवड केली जात असून दरवर्षी येणाऱ्या विविध रोगांमुळे पपई उत्पादक शेतकरी अडचणीत असतो. कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या वतीने पपईवर येणाऱ्या लोकांवर वेळी संशोधन होणे गरजेचे असल्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
(Papaya Damage Due To Outbreaks of diseases In nandurbar)
हे ही वाचा :
जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण किती राहणार? भारतीय हवामान विभागानं काय सांगितलं?