हिंगोली : कारभारात तत्परता यामुळे मराठवाड्यातील हिंगोलीतील संत नामदेव हळद बाजाराला एक वेगळेच महत्व आहे. हंगामाच्या सुरवातीला (Turmeric production) हळदीची मोठ्या प्रमाणात आवक सुरु झाली होती. पण मध्यंतरीच्या (Cloudy Climate) ढगाळ वातावरणामुळे हळद या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने त्याचा परिणाम आता उत्पादनावर होतोय. येथील बाजारपेठेत (inflow from Other states) परराज्यातूनही हळदीची आवक होते. मात्र, गेल्या काही दिवसापासून वसमतच्या बाजारपेठेतही आवक घटली असून पीक अंतिम टप्प्यात असतानाच करप्याच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनावर परिणाम होणार आहे. सध्या समाधानकारक दर असला तरी अधिकच्या दराची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
हिंगोली जिल्ह्यातील बाजारपेठामध्ये मोठ्या प्रमाणात हळदीची आवक असते. शिवाय शेतकऱ्यांना वजन काटा झाला की पैसे हातामध्ये दिले जातात. त्यामुळे परजिल्हा आणि परराज्यातूनही आवक सुरु असते. यंदा मात्र, करपा आणि वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे भविष्यात दर वाढतील असा अंदाज आहे. पण सध्या 9 हजार 600 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ती 15 हजार रुपये दर मिळावा अशी.
खरीपासह रब्बी हंगामातील पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव हा कायम राहिलेला आहे. यापूर्वी केवळ कांदा या पिकावर करपा रोगाचा अधिकचा प्रादुर्भाव होत होता. मात्र, यंदा ढगाळ वातावरणामुळे पिकांपेक्षा कीडीला पोषक वातावरण होते. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. हंगामाच्या सुरवातीला आवक झालेल्या हळदीवर याचा परिणाम नव्हता पण आता नव्याने दाखल होणाऱ्या हळदीवर परिणाम जाणवत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यातून हळदीची आवक येथे होते. येथील व्यवहार चोख असल्यामुळे शेतकऱ्यांचा कलही याच बाजारपेठेकडे अधिक आहे. शिवाय येथील हळदीमध्ये कुकुरमीन या घटकाचे प्रमाण अधिक असल्याने सांगली, सातारा या भागातून मोठी मागणी आहे. यामध्ये सौंदर्य प्रसाधने तयार करण्याचे घटक असल्याने कंपन्यामध्ये मोठी मागणी आहे. शिवाय यंदा पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाली असल्याने आवकही वाढली आहे.