लासलगाव : (untimely rains) अवकाळी पावसाने उघडीप देऊन 15 दिवसांचा कालावधी लोटला असला तरी यामुळे निर्माण झालेली संकटे शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाहीत. (Nashik) नाशिक जिल्ह्यात (Onion crop) कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. शिवाय बाजारपेठही जवळच असल्याने शेतकरी हे नगदी पिक म्हणून कांद्यावर भर देतात. असाच प्रयोग येवला तालुक्यातील बल्हेगावच्या भाऊसाहेब सोमासे यांनी केला मात्र, अवकाळीनंतर (change in environment) बदललेल्या वातावरणामुळे कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होऊ लागल्याने सोमासे यांनी थेट कांदा पिकावर रोटरच फिरवला. त्यामुळे भविष्यातील नुकसान तरी टळेल आणि रब्बी हंगामातील इतर पिक घेता येईल म्हणून हा टोकाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता पावसाने उघडीप दिली असली तरी वातावरणातील बदलामुळे कांदा पिकावर करपा आणि मावा रोग वाढलेला आहे. याच्यावर नियंत्रण केले जात आहे. पण लागवडीपासून 60 हजाराचा खर्च आणि भविष्यातही औषध फवारणी, देखरेख यावर खर्च होणारच त्यामुळे अधिकचा खर्च न करता थेट कांदा पिकच वावरातून बाहेर काढण्याचा निर्णय सोमासे यांनी घेतला. सध्या रब्बी हंगामातील कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. पण बदलत्या वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे कांदा जोपासायचे मोठे अवाहन शेतकऱ्यांसमोर आहे.
शेती मशागतीपासून ते रोपांची खरेदी आणि लागण या दरम्यान, भाऊसाहेब सोमासे यांना 60 हजार रुपये मोजावे लागले होते. मात्र, कांदा हे नगदी पिक असून त्याची जोपासना योग्य केली तर त्यापासून चार पैसे मिळतील ही अपेक्षा सोमासे यांना होती. मात्र, निसर्गाचा लहरीपणा यंदा सर्वच पिकांवर बेतत आहे. त्यामधून कांद्याची तरी कशी सुटका होईल. त्यामुळेच त्यांनी उभ्या पिकात थेट रोटर फिरवून हे क्षेत्र रब्बी हंगामातील पिकासाठी रिकामे केले आहे. येवला तालुक्यातील कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
ढगाळ वातावरणाचा सर्वाधिक परिणाम हा कांदा पीकावर होत आहे. रब्बी हंगामातील कांदा लागवड करुन काही दिवसाचाच कालावधी लोटलेला आहे. मात्र, वातावरणातील बदलामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव होताच मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 10 मिली या बुरशीनाशकांची फवारणी जांभळा, तपकिरी आणि काळा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे आवश्यक आहे. शिवाय धुईचे प्रमाणही वाढत असल्याने कांद्याचे दुहेरी नुकसान होत आहे. त्यामुळे ही फवारणी त्वरीत करण्याचा सल्ला कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे.