मुंबई : देशात जे 80 टक्के अल्पभुधारक शेतकरी आहेत त्यांनाच या (Natural Farming) नैसर्गिक शेतीचा फायदा अधिक होणार आहे. मात्र, ही शेती पध्दती स्वीकारणे ही काळाची गरज झाली आहे. कमी खर्चात अधिकचे उत्पादन हीच नैसर्गिक शेती आहे. मात्र, उत्पादनावाढीसाठी (Farmer) शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. असे दुर्लक्ष होत राहिले तर काही काळातच शेत जमिन नापिकी होईल आणि ते न भरुन निघणारे नुकसान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी खर्चातल्या नैसर्गिक शेतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. पुर्वी रासायनिक खते नसतानाही उत्पादन चांगले होत होते. परंतू, जुने ते सोने आहे ते अंगिकरण्याची तयारी शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे. आणि काळानुरुप हा बदल स्वीकारला तरच उत्पादनात वाढ होणार आहे.
आता पुन्हा पुर्वपदावर येऊन शेती व्यवसाय करण्याची गरज आहे. जगही त्याच तयारीत आहे मात्र, यामध्ये भारताला पोषक वातावरण आहे कारण शेती व्यवसयाची मोठी परंपरा आहे. याच नैसर्गिक शेतीच्या परंपरेचा फायदा उत्पादन वाढीसाठी होणार आहे. केवळ या शेतीपध्दतीला स्विकारुन अत्याधुनिक बदल करणे गरजेचा असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. अर्वाचिन ज्ञानाला आता आधुनिकतेची जोड म्हणजेच नैसर्गिक शेती पध्दत असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे.
आम्हाला आमची शेती रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेतून काढून निसर्गाच्या प्रयोगशाळेशी जोडायची आहे, असे पंतप्रधान म्हणाले. जेव्हा मी निसर्गाच्या प्रयोगशाळेबद्दल बोलतो, तेव्हा ती पूर्णपणे विज्ञानावर आधारित असते. हरितक्रांतीत रसायने आणि खते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे हे खरे आहे. परंतु हे देखील तितकेच खरे आहे की आपल्याला त्याच्या पर्यायांवरही काम करत रहावे लागेल. त्यामुळेच नैसर्गिक शेतीचा पर्यांय हा समोर येत असल्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातील रासायनिक खते आणि कीटकनाशकांपासून शेत जमीन मुक्त करण्याचा संकल्प करू या, असेही शेतकऱ्यांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले. देशातील प्रत्येक राज्याला, प्रत्येक राज्य सरकारला नैसर्गिक शेतीला लोकांची चळवळ बनवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या अमृत महोत्सवामध्ये प्रत्येक पंचायतीचे किमान एक गाव नैसर्गिक शेतीशी जोडले गेले पाहिजे त्यासाठी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.