लातूर : खरीप हंगाम (Kharif Season) अंतिम टप्प्यात असून आता रब्बीची लगबग ही सुरु झाली आहे. सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरीपातील उत्पादनात घट झाली आहे. (Farmer) असे असताना आता बळीराजा रब्बीच्या तयारीला लागला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील (Jwari Crop) ज्वारी हे मुख्य पीक असून याचे उत्पादन वाढीसाठी काय करायला हवे आणि ज्वारीचा दुहेरी फायदा काय आहे याची माहिती आज आपण घेणार आहोत. ज्वारी ज्या भागात पिकविली जाते त्या भागातील गरीब लोकांचे ते आहारातील प्रमुख धान्य आहे.
ज्वारीमध्ये तांदुळापेक्षा प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आजही ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांच्या आहारात ज्वारी ही असतेच. या पोषक धान्याबरोबर ज्वारी पीकाचा कडबा म्हणून जनावरांना वैरणही उपयोगी पडते. त्याची लागवड पध्दत आणि उत्पादन वाढीसाठी काय करायला हवे याची माहीती आपण घेणार आहोत..
ज्वारी हे पीक तसे तीन हंगामात घेतले जाते. पण रब्बी हंगामातील हे मुख्य पीक असून या हिवाळी हंगामातील जाती सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पेरतात. तर पावसाळी हंगामातील जाती जून-जुलैमध्ये पेरणी करतात. खरीप व रबी पिके धान्य आणि वैरणीसाठी लावतात. उन्हाळी पिके ओल्या वैरणीसाठी लावतात. पीक लावण्याचे जिरायत (कोरडवाहू) व बागायत (ओलीताखालचे पीक) असे दोन प्रकार आहेत. जमिनीत पुरेशी ओल असल्यावरच ज्वारीची पेरणी केली जाते.
ज्वारीचे हे काळ्या, मध्यम काळ्या अगर मुरमाड जमिनीत चांगले येते. काही मर्यादेपर्यंत क्षारधर्मी जमिनीत व pH मूल्य 5·5 असेपर्यंत अम्लीय जमिनीतही हे पीक वाढू शकते. हलक्या प्रतीच्या जमिनीवरही या पीकाची वाढ जोमात होते. मात्र, पाण्याचे योग्य नियोजन करावे लागते. यामध्ये आंतरपिक म्हणून उत्तर व मध्य भारतात ते तूर, जवस अगर करडईबरोबर आणि महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू राज्यांच्या काही भागांत चवळी, तूर, उडीद, मूग, मटकी अगर कुळीथाबरोबर मिश्रपीक म्हणून घेतात. काही शेतकरी ज्वारीबरोबर गवार अगर अंबाडीचेही पीक घेतात. रबी ज्वारीत हरभऱ्याचे आंतरपिक घेतात.
दरवर्षी पेरणीपूर्वी नांगरणी ही करावीच असे नाही. तीन-चार वर्षांतून एकदा नांगरली तरी चालते. मात्र, खरीपातील पीकांची काढणी झाली की, मे महिन्यात दोन-तीन वेळा जमीन कुळवाने मोकळी करतात. जमिनीतील ढकळे ही फोडून जमिन पेरणीयोग्य केली जाते.
पेरणीनंतर तीन आठवड्यांनी ज्वारीतील तणामुळे कोळपणी केली जाते. त्यानंतर खुरपणी करुन ओळीतील तण काढून घेतात. लगतच्या कोळपणीमुळे जमीन भेगाळत नाही, पिकाच्या मुळांना हवेचा, वनस्पतिपोषक द्रव्यांचा व पाण्याचा पुरेसा पुरवठा होतो. त्यामुळे एकूण 3–4 कोळपण्या व दोन-तीन खुरपण्या केल्या तर पीक बहरात येते आणि उत्पादनात वाढ होते.
वार्षिक 75 ते 82 सेंमी. पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात ज्वारीच्या कोरडवाहू पिकाला हेक्टरी ६ टन आणि बागायती पिकाला १२ ते १८ टन शेणखत अगर कंपोस्ट पूर्व मशागतीच्या वेळी दिले जाते. हेक्टरी 80 किग्रॅ. नायट्रोजन मिळेल असे कोणतेही रासायनिक खत आणि १९० किग्रॅ. सुपरफॉस्फेट पेरणीच्या वेळी देतात. मात्र संकरित (हायब्रीड) ज्वारीच्या प्रकारांना जास्त खत दिल्यास स्थानिक जातींच्या तुलनेने जास्त उत्पन्न येते. बागायती पिकाला कोरडवाहू पिकापेक्षा जास्त आणि स्थानिक प्रकारांपेक्षा संकरित प्रकारांना जास्त खतांची मात्रा देणे आवश्यक आहे.
पेरणीपासून ज्वारीचे पीक हे पाच महिन्यात तयार होते. ज्वारीचे दाणे चांगले पक्व झाले की ज्वारीची ताटे कापून किंवा उपटून काढली जातात. कापून वा उपटून काढलेली ताटे शेतातच 3–4 दिवस वाळवत ठेवतात. नंतर पेंढ्या बांधून त्या खळ्यावर रचून ठेवतात. बदलत्या काळाच्या ओघात आता ज्वारीची मळणीही यंत्राच्या सहाय्यानेच केली जात आहे. ज्वारीचे दाणे परीपक्व झाले की, मळणी केली जाते त्यामुळे वेळीची तर बचत होतेच शिवाय कष्टही कमी होतात. मळणी व उफणणी ही दोन्ही कामे एकाच यंत्रात होतात. एका तासात 8 ते 12 क्विंटल ज्वारीची मळणी होते.
जमिनीचा दर्जा, पाण्याचा पुरवठा आणि खताची मात्रा आणि मशागत यांवर ज्वारीचे उत्पन्न अवलंबून असते. त्यामुळे उत्पादनात हा फरक आढळतोच. कोरडवाहू खरीप ज्वारीचे हेक्टरी उत्पन्न सर्वसाधारणपणे 4 ते 5 क्विंटल असते. तर दाण्याच्या तीन ते साडेतीन पट कडब्याचे उत्पन्न मिळते. कोरडवाहू रबी ज्वारीचे उत्पन्न हेक्टरी 7 ते 8 क्विंटल एवढे असते तर दाण्याच्या दोन ते अडीच पट कडब्याचे उत्पन्न मिळते. बागायती ज्वारीचे हेक्टरी उत्पन्न 10 ते 15 क्विंटल असते. (Preparation of Rabbi: Plan to increase sorghum production, advise farmers)
गाळप हंगाम सुरु होताच ऊस वाहतूकदार, मुकादमांचा कोयता बंद मेळावा
‘अन्नत्याग’ नंतर आता लातूरात भाजपच्याच आमदाराची शेतकऱ्यांसाठी ‘पदयात्रा’
शेतकऱ्यांनो सोयाबीनच्या घसरत्या दरातही ‘हाच’ निर्णय घ्या अन्यथा अधिकचे नुकसान….