विनय जगताप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 4 ऑक्टोबर 2023 : मध्यंतरी पावसाने ओढ दिल्यामुळे बळीराजा प्रचंड तणावाखाली होता. पिकं वाया जातील की काय अशी भीती त्यांना सतावत होती. तर दुसरीकडे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचं कसं होईल? असा प्रश्नही सतावत होता. मात्र, वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली. गणपतीच्या आगमनासह वरुणराजाचंही दमदार आगमन झालं. त्यामुळे शेतातील पिके तरारली. अन् बळीराजाचा चेहराही आनंदाने खुलून गेला. भात पिकाला पोषक वातवारण निर्माण झाल्याने भात पीकही मोठ्या जोमात आलं आहे. त्यामुळे बळीराजा सुखावून गेला आहे.
मावळात भात पिकासाठी पोषक वातावरण असल्याने भात पीक जोमात आलं आहे. पावसाच्या पुनरागमनानंतर गेल्या 5-6 दिवसांपासून पडणारा पाऊस भात पिकाला पोषक ठरत आहे. त्यामुळे भाताची हिरवीगार रोपं तरारून आली आहेत. ही रोपं वाऱ्यावर डोलू लागली आहेत. पवनमावळ हे मावळमधील भाताचे आगार आहे. मावळमध्ये इंद्रायणी तांदूळाची 95% लागवड केली जाते. इंद्रायणी भाताची चव, चिकटपणा, उत्त्पन्न यामुळे शेतकरी या वाणाला पसंती देतात. हेच इंद्रायणी वाण आता काही ठिकाणी निसवले आहे. त्यामुळे शेतकरी सुखवला आहे.
आता पुढील दीड महिन्यात भात तयार होणार असून बळीराजाच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे अवघ्या दीड महिन्यातच बळीराजाच्या खिशात पैसा खुळखुळणार आहे. ह्यावर्षी भात ही जोमदार आले असल्याने भाताच्या उत्पादनात वाढ होईल, असे कृषी विभागाने सांगितले आहे.
सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात ढगफुटीसदृश्य पावसाने धरणातून इतिहासातील सर्वाधिक विसर्ग करण्याची वेळ रविवारी संध्याकाळी आली. धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने वारणा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शिराळा तालुक्यातील पश्चिम भागात चांदोली धरण परिसरात मुसळधार पावसाने सुरुवात केल्यानंतर मणदूर, सोनवडे, आरळा तसेच परिसरातील वाड्यांना अक्षरशः पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसाने नाल्यांमध्ये पाणीच पाणी झाले. शेती शिवारे तुडुंब झाली आहेत. या पावसाने भात पिकाचे शेकडो एकरातील नुकसान केलं आहे. मणदूरमधील येथील ओढ्याचे पाणी भात शेतीत शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.