भंडारा : राज्यात सक्रीय झालेल्या (Rain) पावसामुळे आता चित्र बदलत आहे. यामुळे सर्वात मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळला आहे. पावसामुळे (Kharif Season) खरिपातील पिकांना जीवदान मिळाले असून आता पाणी पातळीतही वाढ होत आहे. भंडारा जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने (Gosikhurd Dam) गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. या धराणाचे 33 पैकी 9 दरवाजे हे उघडण्यात आले आहेत. अद्यापही गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंत घेतली नसल्याने धरन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जून महिन्यात पावसाने दडी मारली असली तरी जुलै महिन्यात चित्र बदलत आहे.
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणात गेल्या तीन दिवसांपासून पावसामध्ये सातत्य राहिले आहे. या धरणाला 33 दरवाजे असून सध्या होत असलेल्या पावसामुळे 9 दरवाजे हे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धरणातून जवळपास 1 हजार 124.55 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात अशाप्रकारे पाण्याचा विसर्ग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. धरण क्षेत्रात झपाट्याने पाणीपातळी वाढत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय अशीच स्थिती राहिली तर भविष्यात आणखी दरवाजे उघडावे लागतील असेही सांगण्यात आले आहे.
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असले तरी परिणाम मात्र, गडचिरोली जिल्ह्यामध्ये होत आहे. धरणाचे 9 दरवाजे उघडल्याने गडचिरोली जिल्ह्यातील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही स्थिती ओढावल्याने नदी, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. तर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्यावतीने दिला जात आहे.
पावसाअभावी खरीप हंगाम हातचा जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशीपासून राज्यात सक्रीय झालेला पाऊस हा कायम आहे. त्यामुळे रखडलेल्या पेरण्या वेगात होत आहे तर ज्या क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत त्या क्षेत्रातील पिके आता जोमाने वाढणार आहेत. आतापर्यंत पेरणी होणार का नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होता. पण आता परस्थिती बदलत असल्याने विक्रमी उत्पादन मिळेल याबाबत शेतकरी आशादायी झाला आहे. असेच पोषक वातावरण राहिले तर उत्पादनात वाढ होणार असल्याचा विश्वास आहे.