अकोला : पंधरा दिवसांपासून सोयाबीनच्या दराला घेऊन जो घालमेल शेतकऱ्यांच्या मनात सुरु आहे अगदी तशीच अवस्था कापूस उत्पादकांची झालेली आहे. कारण गेल्या महिन्याभरापासून कापसाचे दर स्थिर आहेत तर व्यापारीही खरेदीसाठी हात आखडता घेत आहेत. शिवाय कापूस हंगामही अंतिम टप्प्यात असून शेवटच्या वेचणीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे दर्जाही खलावलेला आहे. मात्र, दरातील स्थिरता आणि घटलेली मागणी यामुळे भविष्यात काय दर राहणार यामध्ये शेतकरी संभ्रमात आहे. सोयाबीन उत्पादकांची जी अवस्था तीच कापूस उत्पादकांची झालेली आहे.
कापसाच्या खरेदीला सुरवात होताच यंदा विक्रमी दर मिळालेला होता. 10 हजार रुपये क्विंटल दर मिळत असताना देखील खरेदीदारांची दमछाक होत होती. मागणी अधिक अन् पुरवठा नगण्य असल्याने कापूस खरेदीसाठी व्यापारी हे गावोगावी भटकंती करुन खेडा खरेदी केंद्राला विक्री करीत होते. शिवाय व्यवहार चोख असल्याने शेतकऱ्यांनाही वेगळेच समाधान होते. पण गेल्या महिन्याभरापासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी घटली आहे. त्यामुळे निर्यातीवर परिणाम झाल्याने अंतिम टप्प्यात कापसाचे दर हे कमी झाले आहेत. 10 हजारावरील कापूस आज 8 हजारावर हेऊन ठेपलेला आहे.
आता भविष्यात कापसाचे दर वाढणार की कमी होणार या संभ्रम अवस्थेत उत्पादक शेतकरी आहेत. सोयाबीनचीही अशी अवस्था झाली होती. त्यामुळे आता गरजेप्रमाणेच कापसाची विक्री हाच शेतकऱ्यांसाठी फायद्याचा निर्णय राहणार आहे. त्यामुळे दर घसरले तरी नुकसान कमी आणि वाढले तरी कमी प्रमाणात का होईना फायदाच होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वच कापूस साठवणूक केला बोंडअळीचा धोका कायम राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री केली तरच फायद्याचे राहणार असल्याचे व्यापारी अशोक आग्रवाल यांनी सांगितले आहे.
हंगामाच्या सुरवातीला मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने पहिल्या वेचनीतील कापसाला 10 हजाराचा दर मिळाला होता. मात्र, मध्यंतरी अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने कापसाच्या क्वालिटीत फरक झाला आहे. शिवाय आता हे पीक अंतिम टप्प्यात असतानाही केवळ पैशामुळे शेतकरी फरदड पीक घेऊ लागले आहेत. फरदड कापूस हा चांगल्या दर्जाचा नसतो. त्यामुळे चांगल्या प्रतिच्या कापसाला 8 हजार तर त्यानंतर मात्र, मालानुसार दर मिळत आहे.