औरंगाबाद : उत्पादनापेक्षा शेतीमालाला बाजारात काय दर मिळणार यावरच सर्वकाही अवलंबून आहे. यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीनबाबत अनोखीच शक्कल लढवली होती. कमी दराने सोयाबीनची विक्री करण्यापेक्षा साठवणूक करुन वाढीव दराची प्रतिक्षा करणेच शेतकऱ्यांनी पसंत केले होते. त्याचा फायदाही शेतकऱ्यांना झाला होता. आता कापसाचीही तीच अवस्था झाली आहे. हंगामाच्या सुरवातीला कापसाला प्रति क्विंटल 10 हजाराचा ( Cotton prices) दर मिळाला होता. पण आता दरात घट झाल्याने शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा कापूस साठवणुकीवर भर दिलेला आहे. (Marathwada) मराठवाड्यातही (Farmer ) शेतकरी आता कापसाची विक्री करीत नाहीत तर साठवणूकीवरच भर देऊ लागले आहेत. भविष्यात दरवाढ होईल अशी अपेक्षा कापूस उत्पादकांना आहे.
यंदा मराठवाड्यात कापसाचे क्षेत्र हे घटले होते. सबंध राज्यातच ही अवस्था झाल्याने हंगामाच्या सुरवातीला कापसाला प्रति क्विंटल 10 हजाराचा दर मिळाला होता. आवक वाढूनही हाच दर कायम राहिलेला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान होते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बदलाचा परिणाम थेट आता स्थानिक बाजारावरही झाला आहे. सध्या कापसाला 8 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मात्र, आगामी काळात पुन्हा दरवाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे कापूस साठवणूक केली जात आहे. मराठवाड्यातील खरेदी केंद्रावर 8 हजाराचा दर मिळत आहे. शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ती 10 हजार रुपये प्रति क्विंटलची त्यामुळे विक्रीपेक्षा साठवणूकच बरी म्हणून शेतकरी घरीच साठवणूक करीत आहे.
खरिपातील केवळ कापूस पीक बहरात होते. शिवाय लागवड क्षेत्रात घट झाल्याने यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच कापसाला चांगला दर मिळाला होता. मात्र, हे पीक अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात उत्पादनात घट तर झालीच आहे पण दर्जाही ढासाळला असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षाभंग झाला आहे. किमान आहे त्या कापसाला योग्य दर मिळावा म्हणूनच शेतकरी साठवणूकीवर भर देत आहेत. शिवाय आता फरदड कापूसही धोक्याचा असल्याने कापूस काढणीवरच भर दिला जात आहे.
सध्या कापसाचे दर घटले असले तरी ओढावलेल्या परस्थितीचा फायदा हे खासगी व्यापारी हे घेत आहेत. हंगामाच्या सुरवातील व्यापारी हे शेतकऱ्यांच्या दारी जाऊन कापसाची खरेदी करीत होते. मात्र, आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भामुळे कापसाच्या मागणीत घट झाली आहे. त्याचा परिणाम थेट दरावर झाला असून स्थानिक पातळीवर व्यापारी हे कापसाची पाडून मागणी करीत आहेत. आता शेतकरी कापूस घेऊन खरेदी केंद्रावर आला तरी कवडीमोल दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी आता कापूस साठवणूक करुन वाढीव दराची प्रतिक्षा करीत आहे.