अकोला : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कोणत्याही हंगामातील बियाणांचा पुरवठा करण्यामध्ये (Mahabij) महाबीज चा मोठा वाटा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही प्रक्रिया सुरु आहे. महाबीजचे बियाणेच आजही प्रमाणीत मानले जाते. शिवाय शेतकऱ्यांचाही विश्वास अधिक दृढ होत आहे. यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका आहे ती (seed production process) बिजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची. या शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेता महाबीजने मोठा निर्णय घेतला आहे. आता (Maharashtra) राज्यभरातील बिजोत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एकच दर राहणार आहे. त्यामुळे दरातील विषमता नष्ट होणार असून सर्वांना समान दर मिळणार आहे. शिवाय सन 2016-17 पासून जो बोनस दिला जात आहे तो कायम ठेवला जाणार असल्याचा निर्णय महाबीजच्या बैठकीत पार पडलेला आहे.
महाबीजने ठरवून दिलेल्या प्रमाणित बियाणांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना एक रक्कम दिली जात होती. मात्र, जिल्ह्यात त्या बियाणाचे दर काय आहेत त्यावरुनच दर निश्चित केले जात होते. मात्र, जिल्हानिहाय दर हे वेगवेगळे असल्याने त्यामध्ये तफावत निर्माण होऊन शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. शिवाय तो रास्तही असून त्यावर तोडगा काढण्याच्या अनुशंगाने महाबीजने आता राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील दरांचा आढावा घेऊन दर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील नाराजी होणार नाही.
जिल्हानिहाय दरामध्ये तफावत असल्याने दरवर्षी हंगाम झाला की शेतकरी हे फरकाची मागणी करीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी पूर्ण तर करावीच लागत होती पण पुन्हा त्यांची नाराजी होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागत असे. त्यामुळे गतवेळचा फरक 400 अधिक 200 असा 600 देण्याची घोषणाच सर्वसाधारण सभेत करण्यात आली शिवाय दरवर्षी फरकावरून गदारोळ नकोच म्हणून एकसमान दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बिजोत्पादन करावे या अनुशंगाने 2016-17 पासून बोनस दिला जात आहे. यामध्ये हरभरा पिकाला 131 रुपये प्रतिक्विंटल, सोयाबीनला 2018-19 मध्ये 200 तर 19-20 मध्ये 500 रुपये असा बोनस दिला जात असल्याचे अॅग्रोवन मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. ठिबकसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत कऱण्यासाठी 10 टक्के सीएसआर मधून निधी देण्याची तयारी संचालक वल्लभराव देशमुख यांनी दर्शवली आहे. त्यामुळे शासनाकडून 80 टक्के अनुदान तर महाबिजकडून 10 असे 90 टक्के अनुदानाचा लाभ बिजोत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे.