अकोला : शेती उत्पादनात वाढ करायची असेल तर सर्वात महत्वाचा घटक तो म्हणजे पाणी. यासाठी एक ना अनेक पर्याय उपलब्ध केले जात आहेत. यंदा तर मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने रब्बी हंगाम जोमात येणार असे चित्र निर्माण झाले होते पण आता पिके बहरात येत असतानाच महावितरण कंपनीने भारनियमन आणि कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत असा दुहेरी शॅाक देण्यास सुरवात केली आहे. तर दुसरीकडे यावर पर्याय म्हणून उभारण्यात आलेवले सौरपंपही बंद आहेत. या सौरकृषीपंपासाठी आवश्यक असलेला सुर्यप्रकाशच सध्या ढगाळ वातावरणामुळे मिळत नाही. त्यामुळे हा नवा पर्याय देखील फेल जात असल्याचे चित्र आहे.
रब्बी हंगामाला सुरवात झाली की, महावितरणची कारवाई हे दरवर्षीचे ठरलेले आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने खरीप हंगामात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरुन काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता. मात्र, निसर्गाचा लहरीपणा आणि महावितरणची कारवाई यामुळे झालेले नुकसान तर सोडाच पण सरासरीएवढे तरी उत्पादन मिळणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण पेरणी झाली पहिल्या टप्प्यात भारनियमनात वाढ करण्यात आली. कृषीपंपासाठी 10 तास विद्युत पुरवठा केला जात होता. तो आता 8 तासांवर आणलेला आहे. कृषीपंपाची थकबाकीपोटी विद्युत पुरवठाही खंडीत केला जात आहे. त्यामुळे पाणी असून शेतकऱ्यांची अडचण झालेली आहे.
खरीप हंगामातील तूर आणि कापूस ही पिके अद्यापही अकोला जिल्ह्यात वावरातच आहेत. तूर शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे योग्य वेळी पाणी मिळाले तर उत्पादनात वाढ होणार आहे. विद्युत पुरवठा खंडीत आणि सौरकृषीपंपाला पुरेसा सुर्यप्रकाश नसल्याने हे पंप देखील बंद आहेत. त्यामुळे पाणीसाठा असूनही त्याचा उपयोग होत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. सध्या सौरकृषीपंप घेण्यासाठी शेतकरी अर्ज करीत आहेत पण वातावरणातील बदलाचा परिणाम यावरही झाला असून राज्य सरकारच्या या योजनेत किती शेतकरी सहभागी होणार हा मोठा प्रश्न आहे.
सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने सिंचनामध्ये मोठी वाढ झाली आहे. मुबलक प्रमाणात शेतकऱ्यांकडे पाणीसाठाही आहे. मात्र, पिकांना पाणी द्यायचे कसे हा प्रश्न कायम आहे. कारण कृषीपंपाच्या थकबाकीमुळे महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा हा खंडीत केला आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे सौरकृषीपंप आहे पण सध्या ढगाळ वातावरणामुळे या पंपाना पुरेसा सुर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे हे पंप पूर्ण क्षमतेने सुरु होत नाही. यंदा सर्वकाही असूनही रब्बी हंगामातील पिकांना पाणी देणे मुश्किल होत आहे.