लातूर : गत आठवड्यात सोयाबीनच्या दरात कायम चढ-उतार तर होतेच. पण आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तर सरासरीच्या तुलनेत 200 रुपयांची घट झाली होती. त्यामुळे आज (सोमवारी) (Latur Market) लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेमके काय होणार याकडे शेतकऱ्यांच्यासह व्यापारी यांचे लक्ष लागले होते. अखेर पहिल्याच दिवशी (Soybean) सोयाबीनच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली आहे. 6 हजार 100 वरील सोयाबीन थेट 6 हजार 400 वर येऊन ठेपलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब असली तरी सोयाबीन विक्री करताना काही नियमांचे पालन हे करावेच लागणार आहे. सोमवारी मात्र, (Soybean arrivals increase) आवक अधिकची होऊनही दरात वाढ झाली. मात्र, कायम हीच परस्थिती राहणार नाही असाच विचार करुन आवकवर लक्ष ठेवावे लागणार आहे.
सोयाबीनची आवक वाढली की दरात घट हे ठरलेलेच आहे. सोमवारी मात्र, आवक वाढूनही दरात कमालीची वाढ झाली होती. मात्र, सोयापेंडवरील स्टॅाक लिमिट, सोयाबीनचे वायदे बंदी या केंद्र सरकारच्या निर्णयाचा परिणाम जर दरावर होऊ द्यायचा नसेल तर मात्र, आवक ही अटोक्यातच राहिलेली चांगली आहे. आवक वाढली तर दर कमी होण्याची शक्यता असते. शिवाय सोयाबीनचे दर हे गेल्या 21 दिवसांपासून अस्थिर आहेत. यातच मागणीपेक्षा अधिक आवक सुरु राहिली तर मात्र, दरावर परिणाम होणार आहे. त्यामुळे सोयाबीनची विक्री करावी मात्र, अचानकच आवक न वाढवता टप्प्याटप्प्याने शेतीमाल बाजारात आणला तर शेतकऱ्यांचाच फायदा होणार असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.
नियमीत सोयाबीन बरोबर आता बियाणांचे सोयाबीनही बाजारात दाखल झाले आहे. मात्र, बियाणे सोयाबीनचे दर हे अधिक आहेत. तर दुसरीकडे तुरीची आवकही घटली आहे. तुरीला खरेदी केंद्रावर 6 हजार 300 रुपये दर हा ठरवून दिलेला आहे. मात्र, अजून तूर खरेदी केंद्र ही सुरु झालेली नाहीत. त्यामुळे व्यापारी मागतील त्या दरात शेतकऱ्यांना विक्री करावी लागत होती. पण 1 जानेवारी पासून खरेदी केंद्र सुरु होणार आहेत. त्यामुळे शेतकरी तूर साठवणूकीवरच भर देत आहे. हमीभावापेक्षा कमी भावात नुकसान करुन घेण्यापेक्षा साठवणूक केली जात आहे. सध्या खरेदी केंद्रावर नाव नोंदणीची प्रक्रिया सुरु आहे. प्रत्यक्ष खरेदीला सुरवात झाली शेतकऱ्यांना त्यााचा लाभ घेता येणार आहे.
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. सोमवारी लाल तूर- 6000 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6050 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6116 रुपये क्विंटल, जानकी चना 4750 रुपये क्विंटल, विजय चणा 4635, चना मिल 4500, सोयाबीन 6491, चमकी मूग 7000 , मिल मूग 6000 तर उडीदाचा दर 7100 एवढा राहिला होता.