लातूर : हंगामाच्या सुरवातीपासून सोयाबीनच्या दरात ना विक्रमी वाढ झाली आहे ना ते निचांकी आलेले आहेत. मात्र, शेतकऱ्यांचा विश्वास आणि (Market) बाजारपेठेतील चढ-उतारामुळे (Soybean) सोयाबीन कायम चर्चेत राहिलेले आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला (Soybean Rate) 6 हजार 600 रुपये दर झाला होता. तेव्हापासून कुठे अधिकची आवक होत असताना पुन्हा दरात घट झाली आहे. आता 6 हजार 200 रुपयांवर गेल्या तीन दिवसांपासून दर आहेत. तर दुसरीकडे सोयाबीनची विक्री करावी का साठवणूक हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात कायम आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात 250 रुपयांची घसरण झालेली आहे. तर 8 हजार पोत्यांवरील आवक ही आता 12 हजारांवर आलेली आहे. गेल्या तीन दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 6 हजार 250 चाच दर मिळत आहे. त्यामुळे आता सोयाबीनची आवक वाढणार का पुन्हा शेतकरी साठवणूकीवर भर देणार हे पहावे लागणार आहे.
खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना देखील सोयाबीनच्या दरातील अनियमितता ही ना शेतकऱ्यांच्या लक्षात आली आहे ना व्यापाऱ्यांच्या. आता सोयापेंडच्या आयातीली स्थगिती देण्यात आली आहे. शिवाय साठामर्यादेची अटही व्यापारी किंवा प्रक्रिया उद्योजकांवर राहणार नाही. त्यामुळे सोयाबीनचे दर वाढतील असा अंदाज बांधण्यात आला होता. पण सोयाबीनच्या दरात वाढ तर झालीच नाही पण 200 ते 250 रुपयांनी घसरण झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तर दर हे स्थिरच आहेत. आवक मात्र, 10 ते 12 हजार पोत्यांची होत आहे. त्यामुळे शेतकरी आता बाजाराचा अंदाज घेऊनच पुन्हा सोयाबीन विक्रीचा निर्णय घेणार असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
नविन तूरीची आवक आता वाढत आहे. पांढरी तूर बाजारात दाखल होत असून या तूरीला हमीभाव केंद्रावर 6 हजार 300 दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, बाजारपेठेत 5 हजार 900 रुपायांनी तू विक्रीची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावलेली आहे. त्यामुळे हमीभाव केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. मात्र, याबाबत कोणतीही हलचाल बाजार समितीच्या आवारात दिसत नाही. त्यामुळे व्यापारी ठरवतेल तोच दर सध्या शेतकऱ्यांना मिळत आहे. ‘नाफेड’ ने लवकरात लवकर खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. मंगळवारी लाल तूर- 6190 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6275 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6221 रुपये क्विंटल, जानकी चना 4960 रुपये क्विंटल, विजय चणा 4900, चना मिल 4750, सोयाबीन 6671, चमकी मूग 7265, मिल मूग 6000 तर उडीदाचा दर 7601 एवढा राहिला होता.