लातूर : ज्या सोयाबीनच्या (Soybean Rate) दरातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढत होती अखेर ते दर स्थिरावले आहेत. उत्पादनात घट होऊनही यंदा हंगामाच्या अंतिम टपप्यात मार्केटमध्ये केवळ (Soybean Crop) सोयाबीनचीच चर्चा आहे. गतआठवड्याच्या शेवटच्या दिवशी झालेली घसरण आणि त्यानंतर चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दरामध्ये सुधारणा यामुळे सोयाबीनच्या विक्रीबाबत शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम अवस्था निर्माण झाली होती. यातच पुन्हा सलग दोन दिवस (Latur Market) लातूर बाजार समितीमधील व्यवहार हे बंद होते. यानंतर मात्र, सोयाबीनचे दर हे गेल्या दोन दिवसांपासून 7 हजार 400 ते 7 हजार 350 वर स्थिरावले आहेत. यामुळे आता साठवणूक केलेल्या सोयाबीनची विक्री की साठवणूक हा प्रश्न कायम आहे पण लातूर बाजार समितीमधील आवक पाहता आता टप्प्याटप्प्याने का होईना सोयाबीन विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतल्याचे चित्र आहे. गुरुवारी 28 हजार तर शुक्रवारी 25 हजार पोत्यांची आवक झाली होती.
गेल्या 15 दिवसांमध्ये सोयाबीनच्या दराच्या बाबतीत जे घडले आहे ते सबंध हंगामात नाही. सोयाबीनची मागणी, युध्दजन्य परस्थिती यामुळे हंगामातील विक्रमी दरावर सोयाबीनने आगेकूच केली आहे. यातच मध्यंतरी अस्थिरतेचे वातावरण होते. त्यामुळे अजून साठवणूक करावी का आहे त्या दरात विक्री असा सवाल होता. पण गेल्या दोन दिवसांपासून दर स्थिरावले आहेत. दर असेच राहिले तर आवक वाढेल असा अंदाज व्यापारी अशोक अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. मात्र, शेतकऱ्यांची भूमिका काय राहणार यावरच सर्व अवलंबून आहे.
यंदा शेतकऱ्यांनी लागलीच सोयाबीनची विक्री केलेली नाही. योग्य दर मिळाल्याशिवाय सोयाबीन बाहेरच काढायचे नाही हा निर्णय अंतिम टप्प्यामध्ये फायदेशीर ठरत आहे. हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनला 4 हजार 800 चा दर होता तर आज सोयाबीन हे 7 हजार 400 रुपयांवर येऊन ठेपले आहे. भविष्यातही असाच दर राहिल पण युध्दजन्य परस्थिती सुधारली आणि उन्हाळी सोयाबीन बाजारपेठेत दाखल झाले तर मात्र, दर घटतील असा अंदाज आहे.
रब्बी हंगामातील हरभरा पिकाची काढणी आणि राशणीची कामे जोमात सुरु आहेत. सध्या हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर असूनही मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी हरभऱ्याला 4 हजार 730 एवढा सरासरी दर मिळाला तर हमीभाव केंद्रावर 5 हजार 230 दर निश्चित केला आहे. असे असताना शुक्रवारी 40 हजार पोत्यांची आवक झाली होती.
सांगा पिकं जगावयची कशी? 88 वर्षीय आजीबाईंचा महावितरण अधिकाऱ्यांसमोरच टाहो..!
‘E-Pik Pahani’ : शेतकऱ्यांच्या हितासाठी पुन्हा निर्णयात बदल, आता किती दिवसांची मुदत?