लातूर : आठवड्याच्या सुरवातीला सोयाबीनच्या दरामध्ये कमालीची घसरण होण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी साठवलेल्या सोयाबीनला काय दर मिळणार असे चित्र निर्माण झाले होते. पण ही घसरण कायम राहिलेली नाही. सोयाबीनचे दर घसरल्यानंतर दोन दिवस स्थिर राहिले तर आता गुरुवार पासून सोयाबीनच्या दरात सुधारणा होत आहे. 6 हजार रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीन शुक्रवारी 6 हजार 400 वर येऊन ठेपले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तर समाधान आहेच पण आता सोयापेंडची आयात होणार का नाही यावरच सर्वकाही अवलंबून आहे.
यंदाच्या हंगामात सोयाबीनच्या दरात कायम चढ-उतार राहिलेला नाही पण झालेले बदल हे साठा करणाऱ्यांना आणि शेतकऱ्यांनाही धक्कादायकच होते. आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात जर दर कोसळतच गेले असते तर मिळेल त्या दरात शेतकऱ्यांना विक्री करण्याची नामुष्की ओढावली असती.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोयाबीनच्या दरात तब्बल सहाशे रुपयांची घसरण झाली होती. 6 हजार 600 रुपयांवर गेलेले सोयाबीन थेट 6 हजावर येऊन ठेपले होते. हा बदल नेमका कशामुळे झाला आहे. हे देखील सर्वसमान्य शेतकऱ्यांच्या लक्षात आला नाही. मात्र, सोयापेंडच्या आयातीची चर्चा ही केंद्रीय पशूसंवर्धन मंत्री यांच्या एका पत्रामुळे सुरु झाली होती. त्याचाच परिणाम सोयाबीनच्या दरावर झाला होताय. मात्र, सोयापेंड आयातीसंदर्भात कोणताच निर्णय न झाल्यामुळे पुन्हा सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे. गुरुवारी 100 रुपयांनी दर वाढले तर शुक्रवारी 300 रुपयांची वाढ झाली आहे.
सोयाबीनच्या दरात कमी-अधिक प्रमाणात बदल होत असतानाही शेतकऱ्यांचा कल हा सोयाबीन साठवणूकीवरच होता. कारण मध्यंतरी 6 हजार 600 रुपये दर असतानाही लातूरच्या बाजार समितीमध्ये केवळ 8 ते 10 हजार पोत्यांचीच आवक होती. आता तर पुन्हा सोयाबीनचे दर वाढू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा शेतकरी साठवणूकीवर भर देणार का हे पहावे लागणार आहे. कारण शेतकऱ्यांना 7 हजारापेक्षाच अधिकच्या दराची अपेक्षा आहे. मात्र, बाजारातील अस्थिरता पाहता शेतकऱ्यांनी अधिकचा काळ सोयाबीनची साठवणूक न करता विक्री करणे महत्वाचे असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शुक्रवारी लाल तूर- 6300 रुपये क्विंटल, पांढरी तूर 5850 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6000 रुपये क्विंटल, जानकी चना 4900 रुपये क्विंटल, विजय चणा 5000, चना मिल 4800, सोयाबीन 7073, चमकी मूग 7200, मिल मूग 6250 तर उडीदाचा दर 7015 एवढा राहिला होता.