लातूर : गतआठवड्यापर्यंत सोयाबीनचे दर हे स्थिर होते. त्यामुळे भविष्यात दर वाढतील अशी अपेक्षा केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर व्यापारी यांना देखील होती. मात्र, बाजारपेठेत आवक अधिक आणि दर कमी असतानाच केंद्र सरकारने आता वायदा बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोयाबीन दर अणखीन कमी होतील असा अंदाज आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरवातीपासूनच सोयाबीनच्या दरात कमी-अधिकपणा सुरु झाला होता. मात्र, दरवाढीसाठी सर्वकाही पोषक वातावरण असतानाही अखेर सोयाबीन 6 हजारावर येऊन ठेपलेले आहे. आता तर वायद्याला बंदी घालण्यात आल्याने शेतकऱ्यांनी साठवलेल्या सोयाबीनचे काय हा सवाल कायम आहेच.
हंगामाच्या सुरवातीपासूनच शेतकऱ्यांनी सावध पवित्रा घेतल्यामुळेच सोयाबीनचे दर हे टिकून आहेत. आतापर्यंत सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढूच दिली नसल्याने दर हे एकतर स्थिर राहिले होते किंवा त्यामध्ये वाढ झाली होती. त्यामुळेच दिवाळीनंतर 2 हजाराने सोयाबीन वाढले होते. आता वायदे बंद होऊन जर आवक वाढली तर मात्र, त्याचा सोयाबीनच्या दरावर परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची आवक मर्यादितच ठेऊन दर कायम ठेवावे लागणार आहेत. दर वाढीच्या प्रतिक्षेत शेतकऱ्यांनी आतापर्यंत साठवणूक केली होती. पण आता आहे ते दर कायम रहावे याकरिताही टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री गरजेची आहे.
आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून सोयाबीनच्या दरात घट झालेली आहे. तब्बल 300 रुपयांनी घट झाली असून अखेर सोयाबीन हे 6 हजारावर स्थिरावले आहे. शनिवारपर्यंत लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाकाठी 12 हजार पोत्यांची आवक होत होती. पण गेल्या 2 दिवसांपासून 8 हजार पोत्यांचीच आवक होत आहे. शेतकऱ्यांनीही सावध पवित्रा घेतला असून दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी आवक ही नियंत्रणातच ठेवणे गरजेचे असल्याचे व्यापारी अशोक आग्रवाल यांनी सांगितले आहे.
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. सोमवारी लाल तूर- 6180 रुपये क्विंटल, पांढरी तूर 5800 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6100 रुपये क्विंटल, जानकी चना 4850 रुपये क्विंटल, विजय चणा 4850, चना मिल 4700, सोयाबीन 6158, चमकी मूग 7150, मिल मूग 6050 तर उडीदाचा दर 7200 एवढा राहिला होता.