लातूर : हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात खरिपातील महत्वाची असलेले सोयाबीन आणि कापसाने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा दिला आहे. आतापर्यंत केवळ नुकसानच झाले होते पण या दोन्ही पिकांच्या दरात चांगलीच सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. दरातील चढ-उतारामुळे महत्वाची समजली जाणारी (Latur Market) लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती देखील अनेक वेळा ओस पडलेली आहे. (Soybean arrivals) दिवसाकाठी 40 ते 50 आवक असताना केवळ 8 ते 10 पोत्यांची आवक या बाजारपेठेत होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून बदल झाला असून 20 ते 25 हजार पोत्यांची आवक सुरु आहे तर सोयाबीनचे दरही स्थिरावले आहेत. सोयाबीन 6 हजार 350 रुपये तर कापसाला 9 हजार 500 रुपये असा विक्रमी दर मिळत आहे.
नवीन वर्षात सोयाबीनचे दर सुधारलेच नाही तर ते स्थिरही झाले आहेत. त्यामुळे बाजारपेठेबाबत विश्वास निर्माण झाला आहे. लातूर बाजारपेठेत आवक दुपटीने वाढलेली आहे. शिवाय शेतकऱ्यांनी केलेल्या साठवणूकीचा अखेर फायदा झाला आहे. मात्र, दर वाढले असले तरी शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाची विक्री ही टप्प्याटप्प्यानेच करणे फायदेशीर राहणार आहे. यामुळे दर तर टिकून राहतीलच पण भविष्यात दरात वाढ झाली तर त्याचा देखील फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापर्यंत ज्या पध्दतीचा अवलंब केला तीच पध्दत कायम ठेवणे गरजेचे असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.
हमीभाव केंद्र सुरु होण्यापूर्वी तुरीचे दर हे 6 हजारापेक्षा अधिक झाले नाहीत. व्यापाऱ्यांनी मनमानी करीत तुरीचे दर ठरवले होते. आता 1 जानेवारीपासून राज्यात तूर हमीभाव केंद्र सुरु झाली आहेत. या केंद्रांना सुरवात होताच बाजारपेठेतील दरही वाढलेले आहेत. खरेदी केंद्रावर तुरीला 6 हजार 300 रुपये दर ठरवून देण्यात आला आहे. तर आता बाजारपेठेतही 6 हजार प्रमाणेच दर मिळत आहे. आता तुरीचा हंगाम सुरु झाला असून खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. तर ग्रामीण भागातील खरेदी केंद्र अद्यापही सुरुच झालेली नाहीत.
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. गुरुवारी लाल तूर- 6300 रुपये क्विंटल, पांढरी तूर 5841 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6000 रुपये क्विंटल, जानकी चना 4818 रुपये क्विंटल, विजय चणा 4750, चना मिल 4800, सोयाबीन 6491, चमकी मूग 6800, मिल मूग 6000 तर उडीदाचा दर 7000 एवढा राहिला होता.