मुंबई : पावसाच्या लहरीपणाचा सामना राज्यातील शेतकऱ्यांना करावा लागलेला आहे. केवळ खरीपातीलच नाही तर मार्च, एप्रिल व मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे (Heavy Rain) व गारपीटमुळे (Loss of farmers due to hailstorm) शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले होते. गतमहिन्यात झालेल्या नुकसानीचे अद्यापही पंचनामे सुरुच आहेत. पण मार्च, एप्रिल व मे दरम्यान झालेल्या नुकसानभरपाईसाठी 122 कोटी 26 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असून तो वितरीत करण्याच्या सुचना विभागीय आयुक्तांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
गारपीट व अवेळी पावसामुळे मार्च, एप्रिल व मे 2021 या कालावधीत कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे फळपिकांचे नुकसान झाले. गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी निधीचे वितरण करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. याकरिता 122 कोटी 26 लाख 30 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
ज्या शेतीचे 33 टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानासाठी मदत करण्याकरिता केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य आपत्ती प्रतिसाद निधी दरानुसार एकूण 122 कोटी 26 लाख 30 हजार इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली असून वडेट्टीवार यांनी तातडीने विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.
गारपीट व अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी कोकण विभागासाठी 29 लाख 30 हजार रुपये, पुणे विभागासाठी 3 कोटी 16 लाख 75 हजार रुपये, नाशिक विभागासाठी 59 कोटी 36 लाख 34 हजार रुपये, औरंगाबाद विभागासाठी 15 कोटी 51 लाख 54 हजार रुपये, अमरावती विभागासाठी 38 कोटी 87 लाख 56 हजार रुपये, नागपूर विभागासाठी 5 कोटी 4 लाख 81 हजार रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.
गारपीट व अवेळी पावसामुळे कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे- फळबागांचे मोठे नुकसान झाले. त्या दरम्यान पाहणी करून मदतीचे आश्वासन देण्यात आले होते. या दौऱ्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले होते. आता प्रत्यक्ष निधी निर्गमित करण्यात आला असून वाटप करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत
पावसामुळे खरीपातील पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पिके पाण्यातच आहेत. प्रशासनाच्या वतीने पिक पाहणी आणि पंचनामे करण्यात आले आहेत. परंतू अद्यापही नुकसानभरपाईची रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे गारपीटीने झालेल्या नुकसानभरपाईसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे त्याप्रमाणेच खरीपातील पिक नुकसानीची मदत देण्याची मागणी होत आहे.
मत्स्यव्यवसायात क्रांती : ‘ई-फिश मार्केट अॅप’ मुळे मासे उत्पादकांना थेट फायदा
काय आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना? योजनेतील बदल शेतकऱ्यांच्या हिताचा
साखर उत्पादनात भारत जगात दुसऱ्या स्थानावर ; यंदाही विक्रमी निर्यात