पुणे : (The vagaries of nature) निसर्गाने यंदा बळीराजाची अशी काय परीक्षा घेतली आहे की, शेती करावी कशी? हाच प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय. निसर्गाच्या लहरीपणामुळे खरिपातील उत्पादन पदरी पडणार की नाही, अशी स्थिती आहे तर दुसरीकडे गेल्या पाच महिन्यापासून (Onion Rate) कांदा दराचा वांदा असल्याने शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर दिलाय. उत्पादनात घट आणि शेतीमालाच्या दरामध्ये घसरण अशा संकटात (Farmer) बळीराजा असताना अंबेगाव तालुक्यातील वळती येथे तर साठवलेला कांदा वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे. ज्या कांद्यावर गेली चार महिने शेतकऱ्यांच्या आशा कायम होत्या तोच कांदा त्याच्या डोळ्यादेखत वाहून गेला आहे. त्यामुळे यंदा सर्वकाही नुकसानीचेच ठरत आहे. शेतकऱ्याने ज्या बराकीत कांदा साठवूण ठेवला होता, त्यामध्येच पाणी शिरल्याने हा वांदा झाला आहे.
गेल्या सहा महिन्यापासून कांदा दरात ही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे गेल्या खरीप हंगामापासून ते उन्हाळी कांदा देखील शेतकऱ्यांनी साठवूण ठेवला होता. किमान भर पावसाळ्यात दर वाढतील ही अपेक्षा शेतकऱ्यांना होती, पण दरात घट ही ठरलेलीच आहे. कांद्याला सरासरी 8 ते 10 रुपये किलोचा दर असल्याने शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा साठवणूकीवरच भर दिला होता. अखेर गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामध्ये नरहरी श्रीपती शिंदे यांचा कांदा वाहून गेला आहे.
गावातील शिंदे मळा येथे नरहरी श्रीपती शिंदे हे शेतकरी राहतात. त्यांच्या घराच्यापाठी मागे ओढ्याच्या पात्रावर सिमेंट बंधारा आहे. या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे या मुसळधार पावसामुळे सिमेंट बंधाऱ्या तील पाणी ओव्हर फ्लो झाले .ओढ्याच्या पात्राच्या कडेला असलेल्या कांदा बराखीत पाण्याचा लोट शिरला. बराखीत अंदाजे साडे चारशे ते पाचशे पिशव्या कांदा साठवून ठेवला होता. पाण्याचा लोट मोठा असल्याने बराकीतील कांदे वाहून खाली रस्त्यावर आले. अंदाजे शंभर ते दिडशे पिशव्या कांदा वाहून गेला.
आतापर्यंत उन्हाळ आणि गतवर्षीच्या खरिपातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे. असे असतानाही यंदाच्या खरीप हंगामात देखील शेतकरी हे कांदा लागवडीवरच भर देत आहेत. राज्यात सध्या खरीप हंगामातील कांदा लागवडीची लगबग सुरु आहे. दरात कमालीची घसरण झाली असली तरी आशादायी असल्याने कांदा लागवडीवर भर दिला जात आहे. राज्यातील नाशिक, नगर, सोलापूर, सांगली या जिह्यात अधिकची लागवड होत आहे.