अहमदनगर : (Sugarcane Sludge Season) ऊसाचा गाळप हंगाम सुरु होऊन आता दोन महिन्यांचा कालावधी लोटलेला आहे. आता एफआरपी अदा करण्याची वेळ कारखान्यांवर आलेली आहे. त्यानुसार काही पश्चिम महाराष्ट्रातील (Sugar Factory) साखर कारखान्यांनी एफआरपी रक्कम दिली आहे. मात्र, ही संख्या केवळ 47 एवढीच आहे. आता ज्या साखऱ कारखान्यांनी एफआरपी रकमेमध्ये मोडतोड केली आहे अशा कारखान्यांवर कारवाई करुन व्याजासहित उर्वरीत रक्कम देण्यात येणार असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे. एफआरपीच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे नेते राजू शेट्टी यांनी वेगवेगळ्या मागण्यांच्या निवेदन त्यांना दिल्यानंतर हे आश्वासन देण्यात आले आहे.
आता एफआरपी रक्कम अदा करण्याच्या प्रसंगी साखर कारखान्यांकडून वेगवेगळी आश्वासने ही शेकऱ्यांना दिली जाऊ शकतात. केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी वेळेत एफआरपी रक्कम अदा केलेली आहे. उर्वरीत साखर कारखान्यांना 30 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी केवळ तक्रार जरी केली तरी त्यांना थकीत एफआरपी रक्कम तर मिळणारच आहे पण त्यावरील व्याजही मिळवून दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो तुम्ही केवळ तक्रारी करा असे आवाहन साखर आय़ुक्त यांनी केले आहे.
आता अनेक साखऱ कारखान्यांवर इथेनॅाल निर्मितीचे प्रकल्प उभारले गेले आहेत. यामाध्यामतून इथेनॅालची निर्मितीही सुरु झाली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम साखरेच्या उतारावर आणि एफआरपी रकमेवर झाला असल्याची बाब राजू शेट्टी यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे. शिवाय ज्या साखऱ कारखान्यांनी एफआरपी रकमेचे टप्पे केले आहेत त्यांच्यावर ‘आरआरसी’ ची कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. ऊसाच्या रसापासून बी हेवी मोलॅसीस, इथेनॅालची निर्मीती होत असल्याने उतार कमी येत आहे. त्याचा परिणाम आता एफआरपी रकमेवरही होणार आहे.
कायद्यानुसार ऊस खेरेदी केल्यानंतर 14 दिवसांच्या आतमध्ये शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ रक्कम देणे बंधनकारक असते मात्र, अनेक कारखाने याचे पालनच करीत नाहीत. सन 2021-22 मधील गाळप हंगाम 15 ऑक्टोंबरपासून सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्यात 155 साखर कारखाने हे सुरु झाले होते. यापैकी केवळ 47 साखर कारखान्यांनी ही रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. राज्यातील 108 साखर कारखान्यांनी ही रक्कम थकवली असून आता 15 दिवसांमध्ये हे थकीत साखर कारखाने काय भूमिका घेतात हे पहावे लागणार आहे.