सांगली : निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका यंदा (Grape Crop) द्राक्ष उत्पादकांना बसलेला होता. उत्पादनात घट तर झालीच पण द्राक्षाची गुणवत्ताही ढासळली होती. त्यामुळे द्राक्षातून नाही किमान (Raisin Product) बेदाण्यातून का होईना उत्पादन वाढीचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. गतवर्षीच्या तुलनेत बेदाण्याचेही उत्पादन घटले असले तरी दर टिकून राहिल्याने द्राक्ष उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. (Festival) सण आणि लग्न समारंभामुळे बेदाण्याच्या मागणीत वाढ झाली आणि त्यामुळेच दरात काही अंशी सुधारणा झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. सध्याचे मागणी आणि दर हे द्राक्ष उत्पादकांना दिलासा देणारे आहेत.राज्यात यंदा 1 लाख 60 हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले आहे.
वातावरण बदलाचा परिणाम ज्याप्रमाणे द्राक्ष उत्पादनावर झाला होता त्याच प्रमाणे वादळी वारे आणि कडाक्याच्या उन्हामुळे बेदणा निर्मितीमध्येही अडथळे निर्माण झाले होते. राज्यात सोलापूर, सांगली, नाशिक आणि कर्नाटकातील काही राज्यांमध्ये बेदणा निर्मिती होते. यंदा डिसेंबर महिन्यातच या निर्मितीची प्रक्रिया ही सुरु झाली होती. मात्र, महिन्याकाठी अवकाळी पाऊस आणि वादळी वारे हे ठरलेलेच होते. त्याचा परिणाम बेदाणा निर्मितीवर झाला आहे. दर्जेदार बेदाणा तयार न झाल्याने अपेक्षित दर मिळाला नाही. पण प्रतिकूल परस्थितीमध्ये द्राक्ष उत्पादकांना या बेदाण्याचा आधार मिळाला हे नक्की. उत्पादनात घट झाली असली तरी दरात फारशी तेजी-मंदी आली नाही. त्यामुळे किमान नुकसान तर टळलेच पण उत्पन्नही शेतकऱ्यांच्या पदरी पडले आहे.
सध्या बेदाणा निर्मितीची प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे. राज्यात 1 लाख 60 हजार टन बेदाणा उत्पादन झाले आहे. सरासरीच्या तुलनेत उत्पादन घटले असले तरी सध्याचे सण उत्सव आणि लग्नसमारंभ यामुळे बेदाण्याला मागणी आहे. सांगली, तासगाव आणि पंढरपूर या तिन्ही बाजारपेठांमध्ये 1 हजार 500 टन बेदाण्याची विक्री झाली आहे. त्यामुळे येत्या काळात आणखीन मागणीत वाढ होईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहे. त्यामुळे द्राक्षातून नुकसान झाले असले तरी बेदण्यातून उत्पन्न वाढावे अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये बेदाणे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. एक नंबर प्रतीच्या बेदाण्याला 160 ते 220 रुपये किलो असा दर आहे तर दोन नंबरसाठी 110 ते 150 रुपये व निकृष्ट दर्जाचे बेदाणे हे 10 रुपये ते 60 रुपये किलो असा विकला जात आहे. हे दर सर्वसाधारण असल्याने भविष्यात मागणीत वाढ आणि दरात सुधारणा होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.