मुंबई : (Monsoon Rain) हंगामाच्या सुरवातीचा जून महिना अनेक जिल्ह्यांसाठी कोरडा गेला असला तरी त्याची कसर ही जुलै महिन्यात भरुन निघाली आहे. जुलैच्या 1 तारखेपासून राज्यात सुरु झालेले पावसाचे थैमान हे 18 जुलैपर्यंत कायम होता. आता पावसाचा जोर कमी झाला असला तरी (Dam Water) धरणांमध्ये आवक सुरुच आहे. त्यामुळे जुलैच्या अंतिम टप्प्यातच सरासरीपेक्षा अधिकचा (Storage Water) पाणीसाठा झाला आहे. परिणामी पिण्याच्या पाण्याची तर चिंता मिटली असून आता नद्यांमध्ये विसर्ग सुरु आहे. शिवाय जुलै महिन्याचा शेवटही धुवाधार पावसाने होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. वाढत्या पावसाने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असली तर यामध्ये सातत्य राहिल्यास खरिपातील पिकांच्या नुकसानीचा धोका आहे. राज्यात मध्यंतरीच्या अतिवृष्टीनंतर आता रिमझिम पावसाला सुरवात होत आहे.
जिल्ह्यात तीन मध्यम आणि 135 लघु प्रकल्प असून गेल्या काही दिवसांतील समाधानकारक पावसामुळे सर्वच प्रकल्पांची पातळी वाढली आहे. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पातही आतापर्यंत 66.16 टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे वाशिमसह जिल्ह्यातील इतरही गावांमधील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता बहुतांश मिटली आहे. यंदाच्या पावसाळ्यातील जून महिना उलटूनही मोठ्या पावसाने हजेरी लावलेली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातील तीन मध्यम आणि 135 लघु प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा शिल्लक होता. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाने दमदार हजेरी लावायला सुरुवात केली. बहुतांश प्रकल्प 50 टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत.
जून महिन्यात राज्यात सर्वत्र मान्सूनची अवकृपा राहिली असली तरी हंगामाच्या सुरवातीपासून कोकण आणि मुंबईवर कृपादृष्टीच राहिलेली आहे. त्याचेच परिणाम आता पाहवयास मिळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील 60 लघु प्रकल्पापैकी 46 लघु प्रकल्पाची धरणे 100 टक्के भरली आहेत. तीन मध्यम प्रकल्पांपैकी 1 पूर्ण क्षमतेने भरला आहे तर गतवर्षी याच काळात लघुप्रकल्प हे 100 टक्के भरलेले होते. अद्यापही कोकणात पावासाचे थैमान हे सुरुच आहे.
अमरावती जिल्ह्यातील वर्धा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने या धरणाचे सर्वच्या सर्व म्हणजे 13 दरवाजे हे खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे वर्धा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असून नदीला पूर आलेला आहे. त्याच अनुशंगाने आर्वी-कौंडण्यपूर हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. कौंडण्यपूर येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने मोर्शी- आष्टीची देखील वाहतूक ही बंद कऱण्यात आलेली आहे.
वाशिम जिल्ह्यामध्ये पावसामध्ये सातत्य आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पेन टाकळी प्रकल्पाची दोन दरवाजे उघडण्यात आले असून त्याच पाणी पैनगंगा नदीमध्ये विसर्ग करण्यात येत आहे.त्यामुळे नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि वाशिम तालुक्यातील नदी काठी असलेल्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.