पुणे : तुरीची आवक बाजारपेठेत येण्यास सुरवात झाली आहे. पण ही आवक सुरु होण्यापूर्वीच हा खरिपातील मुख्य संकट आहे ते दरवाढीचे. सध्या सोयाबीनचे दर हे स्थिर आहेत तर शेतकऱ्यांना तूर या पिकातून मोठ्या अपेक्षा आहेत. पण सरकारच्या निर्णयामुळे तुरीच्या दराबाबतही चिंतेचे ढग कायम आहेत. कारण यापूर्वीच 4 लाख 42 हजार टन तुरीची आवक ही झालेली आहे. शिवाय यंदाच्या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या काळात 4 लाख 27 हजार टन तूर ही आयात झाली आहे. त्यामुळे गतवर्षीचा साठा आणि यंदाची आवक यामुळे तुरीचे दर हे दबावातच राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आता कु़ठे बाजारपेठेत तुरीची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे हमीभावापेक्षाच सध्या कमी दर आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकात तुराचे पिक अधिक प्रमाणात घेतले जाते. या दोन्ही राज्यांमध्ये तब्बल 50 लाख हेक्टरावर तुरीचा पेरा झाला होता. हंगामाच्या सुरवातीला तूर पीक बहरात होते. शिवाय अतिवृष्टीचा देखील परिणाम झाला नव्हता पण अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलाचा फटका या पिकाला ऐन काढणीच्या दरम्यान बसला होता. वातावरणातील बदलामुळे शेंग पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे उत्पादनात घट होत आहे. दोन्ही राज्यांमध्ये 44 लाख टन उत्पादन होईल असा अंदाज होता. मात्र, यामध्ये घट होऊन 30 लाख टन उत्पादन होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या 8 दिवासांपासून बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात आवक कमी असली तरी तुरीला हमीभावाप्रमाणेही दर मिळत नाहीत. भविष्यात पुन्हा आवक वाढली तर मात्र, हमीभाव केंद्राची गरज भासणार आहे. तुरीला 6 हजार 300 चा दर नाफेडने ठरवलेला आहे. मात्र, सध्या 6 हजारापर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे आवक सुरु होण्यापूर्वीच हमीभाव केंद्र सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती पण याकडे दुर्लक्ष झाले आहे. आता शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
तुरीची आयात आणि सध्याचे उत्पादन यामुळे भविष्यात अधिकचे दर वाढतील असे नाही. केंद्र सरकारने तुरीला 6 हजार 300 चा हमीभाव ठरवलेला आहे. आता शेतकऱ्यांनी जर सोयाबीनप्रमाणेच तुरीच्या साठवणूकीवर भर दिला मात्र, दरात वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता तूर विक्रीपेक्षा साठवणूकीवर अधिकचा भर द्यावा लागणार आहे. तरच दर हे टिकवून राहणार आहेत. अन्यथा हमी भाव केंद्र सुरु होण्याची वाट पाहावी लागणार आहे.