अकोला : एकदा लळा लागला की मग रक्ताची नातीही फिकी पडतात. (Akola District) अकोला जिल्ह्यातील अंत्री गावाने तर (Peacock) मोराला जीव लावला होता. त्याचं लोकवस्तीमध्ये वावरणं, ग्रामस्थांच्या अंगणात पिसारा फुलवणं..एवढंच नाही तर कोंबड्यांसोबत दाणं टिपणं…या सर्वांची ग्रामस्थांना जणूकाही सवयच झाली होती. मोर दिसला की त्याचे फोटो किंवा पिस घेण्यासाठी धडपड असा कोणताही प्रकार या गावात घडत नव्हता. लहानाचा मोठा झालेला हा मोर सर्वांचाच लाडका होता. मात्र, बुधावरचा दिवस जणूकाही विघ्न घेऊनच उगवला होता. विद्युत तारेच्या शॉकने मोराचा जागीच मृत्यू झाला. हायटेंशनच्या लाईनवर (Peacock Death) मोर बसल्याने ही दुर्घटना घडली. मात्र, मृ्त्यू मोराचा झाला असला तरी आख्खं गाव शोकाकूल वातावरणात आहे. बुधवारी गावात चूलही पेटली नाही. गावातील प्रत्येकजण या घटनेमुळे उपाशीपोटी झोपला होता.
रक्ताचीच नाती जवळची असे काही नाही तर एकदा जर का लळा लागला तर काय होऊ शकते हे या मोराच्या घटनेवरुन लक्षात येते. त्याच्या असण्यामध्ये गावकऱ्यांना वेगळा आनंद होता. मात्र, ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरली. यानंतर मात्र, कोणी साधी चूलही पेटवली नाही. घटनेची माहिती वन विभागाला देऊन पंचनामा तो करण्यात आला पण गावातील कोणीच त्यादिवशी जेवला नाही. हे असं नातं मोराचं आणि गावकऱ्यांचे झाले होते.
वन्यप्राण्यांचा लोकवस्तीमध्ये वावर वाढत असला तरी अंत्रीच्या गावकऱ्यांना मोराचा लागलेला लळा काही वेगळाच होता. अगदी लहाणपनापासून हा मोर जंगलात फिरायचा आणि रात्रीच्या वेळी गावात यायचा. याची जणू सवयच ग्रामस्थांना झाली होती. गेल्या चार ते पाच वर्षापासून हाच मोराचा दिनक्रम होता. प्रत्येकाला याची सवय झाली होती. बुधवारी मात्र, भलतेच काहीतरी घडले. गावातीलच वीज तारेवर मोर बसायला गेला आणि तारेमध्ये विद्युत प्रवाह संचारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांसाठी ही धक्कादायक बाब होती. सबंध गावात कमालीचा शुकशुकाट होता.
दिवसभर मोर जंगलात फिरायचा आणि सायंकाळी या गावचा रस्ता धरत होता. गावकऱ्यांच्या घरापर्यंत त्याचा वावर असायचा. अंगणात तो बिंधास्त बसायचा ‘ तर कोंबड्यांमध्ये राहून दाणे टिपायचा लहान मुले जवळ गेले तरी घाबरायचा नाही. गावकऱ्यांना 4 ते 5 वर्षांपासून लळा लागला होता. तर एवढा मोठा पिसारा असल्यावरही गावातील कुणीही मोर जवळ आल्यावरही मोराचे पिस काढत नव्हता. या मोराची सवयच जणूकाही गावकऱ्यांना झाली होती. वन्यप्राणी मानव वस्तीमध्ये येतात अन् परतही जातात. मात्र, या मोराने गाव हेच आपल्या विसाव्याचे केंद्र मानले होते.