वाशी : हंगामाच्या सुरवातीला शेतीमालाचे दर तसे नियंत्रणातच असतात. त्यानंतर मात्र, मागणीवरच सर्वकाही अवलंबून असते. (Increase in Custard Apple) सीताफळाने हंगाम सुरु झाल्यापासून बाजारपेठेत एक वेगळेच महत्व टिकून ठेवलेले आहे. गणेशोत्सवापासून सुरु झालेला हंगाम आता अंतिम टप्प्यात असतानाही (Washi Market) वाशीतील घाऊक बाजारात आवक तर मोठ्या प्रमाणाक होत आहे शिवाय दरही टिकून आहेत. विशेषत: देशी आणि गोल्डन जातीच्या सीताफळाला अधिकची मागणी असून आता शेवटच्या टप्प्यात या सीताफळाचे दर हे 150 ते 200 रुपये किलोवर गेले आहेत. तरीही या सीताफळांची चवच न्यारी असल्याने मागणीत वाढ होत आहे.
आतापर्यंत अवकाळी, रोगराईमुळे सर्वच पिकांचे आणि फळांचे नुकसान झालेले आहे. पावसाच्या फटका सीताफळ उत्पादनावरही झालेला आहे. मात्र, तो कमी प्रमाणात असल्याने हंगामाच्या सुरवातीपासूनची आवक आजही कायम आहे. उशिरा का होईना सुरु झालेली आवक आज शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरत आहे. देशी सीताफळाला 200 ते 250 व गोल्डन सीताफळाला 150 रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही भर पडलेली आहे. शिवाय ग्राहकांची पसंती या दोन सीताफळांनाच असल्याने मुख्य पिकांतून नाही पण सीताफळासारख्या हंगामी पिकातून का होईना चार पैसे शेतकऱ्यांना मिळाल्याच समाधान आहे.
वाशी येथील घाऊक बाजारात दिवसाकाठी 4 ते 5 टेम्पो सीताफळाची आवक होत असल्याचे दै. सकाळमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. नाशिक, जुन्नर, सासवड, नगर आणि कर्नाटक येथून सीताफळाची आवक होत आहे. यंदा पावसामुळे सीताफळाची आवक ही पावसामुळे उशिरा सुरु झाली होती. त्यामुळे अणखीन काही दिवस अशीच आवक राहिली तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. सीताफळांना चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.
मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत बोरांची आवक सुरु झाली आहे. दिवसाकाठी वाशी बाजार समितीमध्ये 8 ते 10 हजार किलो बोरांची आवक सुरु आहे. यामध्ये सर्वाधिक बोरांची आवक ही सोलापूर आणि सांगोल्यातून आहे. बोरांसाठी आवश्यक असलेला पाऊस यंदा वेळेत झाल्याने बोरं उत्पादनाच्या बाबतीत सर्वकाही वेळेत होत आहे. हिरवी, केशरी, उमराण, पोपटी रंगाची, अॅपल बोरं, आंबट गोड अशा सर्व प्रकारची बोरं नववर्षाच्या सुरवातीलाच दाखल झालेली आहेत. उमराण 10 ते 15 रुपये किलो, चमेली बोरं 20 ते 25 रुपये तर अॅपल बोरे 30 ते 40 रुपये किलो विकली जात आहे. त्यामुळे मुख्य पिकांचे पावसामुळे नुकसान झाले असले तरी हंगामी पिकांनी कसर भरुन काढली आहे.