वाशिमच्या : वाशिमच्या (Washim) मंगरुळपिर (mangarulpir) तालुक्यातील निंबी सिंचन (Nimbi irrigation) प्रकल्प मागील 10 वर्षांपासून लाल फित शाईत अडकल्यानं याचं काम अर्धवट अवस्थेत आहे. यामुळं शेकडो हेक्टर शेतीला पाणी मिळत नाही. अनेक शेतकरी सिंचनापासून वंचित राहिल्यानं शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप असून हा अर्धवट प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी चांगला प्रकल्प व्हावा म्हणून जागा दिली आहे. 2013 मध्ये सिंचन प्रकल्प निर्मितीला सुरुवात झाली असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
वाशिमच्या निंबी परिसरातील 500 एकर हुन अधिक शेतीचं सिंचन होऊन माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघावा यासाठी 2013 मध्ये सिंचन प्रकल्प निर्मितीस सुरुवात झाली. काही दिवस या प्रकल्पाचं काम सुरू झालं, मात्र ते काम बंद पडलं.
हे काम पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी मृद व जलसंधारण विभागाकडे अनेकदा पाठपुरावा केला. मात्र त्यांच्या मागणीला अधिकाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्यानं या प्रकल्पाचं काम रखडलं असल्याची खंत शेतकरी बोलून दाखवत आहेत.
निंबी सिंचन प्रकल्प मागील 10 वर्षांपासून अर्धवट आहे. हा सिंचन प्रकल्प जर वेळेत पूर्ण झाला असता तर आमची 500 एकरहून अधिक शेत जमीन सिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांना चांगली पिकं घेता आली असती. आम्ही अनेकदा अधिकाऱ्यांकडे मागणी केली. मात्र अद्याप या प्रकल्पाचं काम सुरू झालं नाही जर हे काम लवकर सुरू झालं नाही तर आम्ही शेतकरी तीव्र आंदोलन करणार असल्याचं पवन टोपले, शेतकरी यांनी सांगितले.
आम्ही आमच्या शेत जमिनी या सिंचन प्रकल्पासाठी दिल्यात, ज्यामुळं आमच्या इतर शेतीला पाणी मिळेल. मात्र तसं झालं नाही.
अधिकाऱ्यांनी चालढकल केल्यानं हा प्रकल्प अपूर्ण असून लवकरात लवकर हा अर्धवट प्रकल्प शासनानं पूर्ण करावा असं शेतकरी डिगांबर टोपले यांनी सांगितले.