मुंबई : खरीप हंगामातील शेवटचे पीक समजले जाणाऱ्या तूरीची आवकही बाजारपेठेत सुरु झाली आहे. मात्र, हमीभावापेक्षा कमी दर बाजारात असल्याने (Farmer) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. अखेर ‘नाफेड’च्यावतीने हमीभाव केंद्राला सोमवारपासून सुरवात झाली आहे. त्यामुळे आता या पिकाला (Guarantee Centre) रास्त दर मिळणार आहे. (Toor Crop) तूर पिकाला 6 हजार 300 चा हमीभाव ठरविण्यात आला होता. मात्र, आवक सुरु होताच व्यापाऱ्यांकडून कमी दराने खरेदी सुरु झाली होती. शिवाय शेतकऱ्यांकडेही कोणता पर्याय नव्हता. नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात घट झाल्याने हमीभावाने तूरखरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता होती. त्याअनुशंगाने अखेर आता प्रक्रियेला सुरवात झाली आहे.
हमीभाव केंद्र सुरु झाली की, थेट तूर ही विक्री करता येणार नाही. त्यासाठी आगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे. कारण नोंदणीनुसारच खरेदी होणार. त्यामुळे पिकाची नोंदणी तर नाफेडकडे राहणारच आहे. पण कागदपत्रांची पूर्तता केल्यामुळे अनियमितता होणार नाही. अन्यथा शेतकऱ्यांच्या नावाखालीच व्यापारी अधिकच्या दरासाठी केंद्रावर मालाची विक्री करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार कार्ड, 7/12 उतारा, बॅंक खाते पासबुकची झेरॅाक्स, 8 अ, आदी कागदपत्रे जमा करुन विक्रीपूर्वी नोंदणी ही बंधनकारक राहणार आहे.
तूरीची काढणी सुरु होण्यापूर्वीच खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांची होती. मात्र, ही केंद्र प्रक्रियेतच अडकली होती. अखेर सोमवारपासून केंद्र सुरु होत असल्याचे नॅशनल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक एस. के. सिंग यांनी सांगितले. खरेदी केंद्रावर मिळणारा दर आणि कृषी उत्पन्न बाजारात तूरीला मिळणारा दर यामध्ये 400 रुपयांची तफावत होती. नाफेडने तूरीचे दर हे 6 हजार 300 रुपये ठरवला आहे तर बाजारात आता 5 हजार 900 रुपयांनी खरेदी केली जात आहे. त्यामुळे प्रति क्विंटलमागे 300 ते 400 रुपये शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. आता केंद्राचा मोठा आधार शेतकऱ्यांना मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या धोरणाचा परिणाम प्रत्येक शेतीमालावर होत आहे. यापूर्वीही सोयापेंडच्या आयातीमुळे सोयाबीनचे दर कमी झाले होते. आता तुरीचे उत्पादन होण्यापूर्वीच 2 नोव्हेंबरपर्यंत देशात 2 लाख 27 हजार टन तूर आयात झाली. त्यामुळे देशात तूर आवकेचा हंगाम नसतानाही तुरीचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यातच सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत देशातील तूर उत्पादक पट्ट्याला अनेक वेळा पावसाने झोडपले. सततचा पाऊस, मर रोग, बुरशीचा प्रादुर्भाव यामुळे पिकाला फटका बसला. अनेक भागांत उत्पादकता निम्म्यापर्यंत खाली आली आहे. घटत्या उत्पादनामुळे अधिकचे दर मिळणे अपेक्षित होते पण सरकारच्या निर्णयामुळे उलटेच झाले आहे.