नवी दिल्ली : शेतकरी असल्याचं खोटं सांगत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Scheme) फायदा घेणाऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. आता या योजनेतील लाभार्थींची तपासणी सुरू झालीय. गावागावात जाऊन याबाबत चौकशी होणार आहे. विशेष म्हणजे खोटी माहिती देऊन या योजनेंतर्गत शेतीसाठीची वार्षिक 6 हजाराची मदत घेणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. त्यांची मदत बंद तर केली जाईलच, मात्र सोबत याआधी मिळवलेल्या पैशांचीही भरपाई करुन घेण्यात येणार आहे. या योजनेत 5 टक्के लाभार्थ्यांची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन तपासणी करण्याची तरतूद आहे. त्याचीच आता अंमलबजावणी सुरू आहे (Verification of PM Kisan Samman Nidhi Scheme Beneficiaries in India).
उत्तर प्रदेशामधील गोरखपूर जिल्ह्यात या तपासणीला सुरुवातही झालीय. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कृषी विभागातील अधिकारी गावा-गावात जाऊन या लाभार्थी यादीची पाहणी करुन सत्यता तपासत आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील 5 टक्के लाभार्थ्यांची यादी तयार झालीय. यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना ही यादी देऊन लाभार्थींचे नाव, मोबाईल नंबर आणि आधार कार्डची (Aadhaar Card) सत्यता तपासली जाईल. तसेच ते शेतकरी आहेत की नाही हेही पाहिलं जाईल. या तपासणीत ज्यांची माहिती खोटी सापडेल त्यांची मदत तातडीने बंद करण्यात येईल.
पीएम किसान योजनेत अनेक खोटे लाभार्थी असल्याचं समोर आलंय. उत्तर प्रदेश, आसाम, तामिळनाडू, बिहार, गुजरात आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये 33 लाख लोकांनी खोटी माहिती देऊन या योजनेची मदत मिळवली आहे. त्यामुळे जवळपास 2326 कोटी रुपये बनावट लाभार्थींकडे गेले आहेत. यातील सर्वाधिक 377 कोटी रुपये आसाममधील बनावट लाभार्थ्यांच्या खात्यात गेले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 1,78,398 शेतकऱ्यांनी याचा गैरफायदा घेतलाय.
Verification of PM Kisan Samman Nidhi Scheme Beneficiaries in India