पुणे : कारखान्यांकडून शेतकऱ्यांची लूट ही ठरलेलीच आहे. मग ती एफआरपी मध्ये असो की तोडणी झालेल्या उसाच्या मापात असो. आता काळाच्या ओघात यंत्राच्या सहाय्याने (Sugarcane Harvesting) ऊसतोडणी होत आहे. त्यामुळे वेळीची बचत तर होत आहे. पण उसाच्या वजनात शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागत आहे. यंत्राच्या सहाय्याने उसतोडणी झाली की, पाचटाचे 8 ते 10 टक्के वजन असते म्हणून एकूण वजनात घट केले जाते. याचा थेट परिणाम उसाच्या वजनावर होत आहे. त्यामुळे ऊसतोड वजावट करण्याची मागणी शेतकऱ्यांनी ( Sugar Commissioners) साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.
उसाचे गाळप सुरु झाल्यापासून साखर कारखाने हे चर्चेत आहेत. यापुर्वी शेतकऱ्यांचा एफआरपी थकीत ठेवल्यामुळे तर आता तोडणी दरम्यान उसतोड वदावट केली जात आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उसाच्या वजनावर पर्यायाने दरावरच परिणाम होत आहे. मात्र, यासंदर्भात ऊस नियंत्रण आदेश यामध्ये किती तोड असावी याबाबत उल्लेख नसल्याने काही कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचे साखर आयु्क्त यांनी स्पष्ट केले.
सध्या ऊसतोड मजूरांपेक्षा यंत्राच्या सहाय्याने तोड होते. यंत्राच्या सहाय्याने तोड होताना ऊसाचे पाचट हे बाजूला केले जात नाही. या पाचटासकटच वजन केले जाते. त्यामुळे अधिकचे वजन होते. त्यामुळे साखर कारखाने हे उसाच्या पाचटाचे वजन म्हणून एकूण वजनाच्या 8 ते 10 टक्के वजन हे कमी करतात. मात्र, यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे मत शेतकऱ्यांचे आहे. म्हणूनच कोल्हापूरच्या आंदोलन अंकूश संघटनेचे पदाधिकारी थेट साखर आयुक्त यांच्या कार्यालयात गेले होते. मात्र, याबाबत काही तरतूद नसल्याने कारवाईबाबत आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट नकार दिला.
ऊसतोडीतील वजावटमुळे उस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे मापात पाप करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी साखर आयुक्त यांच्याकडे केली होती. मात्र, कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचे सांगताच शेतकऱ्यांनी यामागचे कारण लेखी देऊन आम्हाला कोर्टात जाऊ द्या असे म्हणत लेखी मागणी केली. मात्र, लेखी देता येत नाही म्हणताच मग आम्हाला येथेच फाशी द्या म्हणत शेतकरी आणि साखर सहसंचालक यांच्यामध्ये बाचाबाची झाली. मात्र, शेतकऱ्यांचा प्रश्न कायमच राहिला आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने ऊसाची जोपासणा केली आहे. पावसामुळे इतर हंगामातील पिकांचे तर नुकसान झालेच आहे. पण आता उसामधून उत्पन्नाची अपेक्षा असताना तोडणी झाली की, ऊसाची वजावट केली जात आहे. त्यामुळे हे बेकायदेशीर आहे. यंत्राच्या सहाय्याने ऊसतोडणी केल्यामुळे वेळेची बचत होती मात्र, शेतकऱ्यांना थेट आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे.