मुंबई : शेती व्यवसायामध्ये अमूलाग्र बदल होत आहे. अत्याधुनिक साधनांचा वापर करुन उत्पादनाची वाढ आणि वेळीची बचत असा दुहेरी उद्देश साधला जात आहे. आता त्याच अनुशंगाने किटकनाशकांच्या (drug spraying) औषध फवारणीसाठी (use of drones) ‘ड्रोन’ चा वापर केला जाऊ लागला आहे. मात्र, या अत्याधिनक प्रणालीचा वापर करीत असताना काय काळजी घ्यावी याबाबत (Ministry of Agriculture) कृषी मंत्रालयाकडून एक नियमावलीच जारी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन ड्रोनचा वापर केला तर ते अधिक सुरक्षित राहणार आहे. या प्रणालीमुळे शेती व्यवसायात प्रगती होणार आहे. मात्र, त्याचबरोबर योग्य ती काळजी घेणेही गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांपासून कृषी व्यवसयातील काही घटकांमध्ये ड्रोनचा वापर वाढला आहे. काही राज्यांमध्ये ड्रोनचा वापर यापूर्वीपासूनच केला जात आहे. त्याचा परिणाम काय होतो याचा अभ्यास केला जात आहे.
ड्रोनच्या माध्यमातून किटनाशकांवर औषध फवारणी करण्याची मोठी क्षमता आहे. असे असले तरी यामध्ये पिकांचे संगोपन आणि काही दुष्परिणाम होणार नाहीत त्याअनुशंगाने कृषी मंत्रालय हे काळजी घेत आहे. यामध्ये पिक फवारणी क्षेत्र, फ्लाय क्लिअरन्स, वजनाची मर्यादा, नोंदणी, सुरक्षा विमा तसेच हंगामी परस्थितीचा उल्लेख याचा समावेश नियमावली तयार करताना करण्यात आला आहे. एवढेच नाही तर ड्रोन उडवण्यापूर्वी आणि खाली उतरवतानाही काय काळजी घ्यावयची याची नियमावली ठरवून देण्यात आली आहे.
ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करताना शेतकऱ्यांना केवळ मंजूर किटकनाशकांचाच वापर करावा लागणार आहे. त्यासाठीची उंची किती राहणार आणि प्रमाणदेखील निश्चित केले जाणार आहे. सुरक्षतेच्या दृष्टीने हवेतून फवारणी करण्यापूर्वी संबंधित ऑपरेटरला 24 तास आगोदर तेथील स्थानिकांना याची माहिती द्यावी लागणार आहे. ड्रोन चालवण्यासाठी संबंधित व्यक्तीला योग्य ते प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचेही कृषी मंत्रालयाने सुचवलेले आहे. याशिवाय त्याला किटकनाशकाचे परिणाम काय होणार आहे त्याचीही माहिती असणे गरजेचे आहे.
क्रॉपलाइफ इंडिया या कृषी उद्योग संघटनेने ड्रोन बाबतच्या नियमावलीचे स्वागत केले आहे. कृषी मंत्रालय, केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालय यांच्यामध्ये सखोल चर्चा झाल्यानंतर ही मार्गदर्शक तत्त्वे समोर आली आहेत. यामध्ये किटकनाशकांच्या फवारणी बरोबरच सुरक्षतेच्यादृष्टीने झालेला विचार करण्यात आला ही अभिमानाची बाब असल्याचे क्रॉपलाइफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्टित्वा सेन यांनी सांगितले. या मार्गदर्शक तत्त्वांच्या परिणामानंतर इतर आशियाई देशांमध्ये हे नियम लागू करण्याचा विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.