लातूर : यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसयाचे गणितच बिघडलेले आहे. यापूर्वी खरिपातील सोयाबीन, उडीद या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते तर आता कापूस आणि तूर अंतिम टप्प्यात असताना ढगाळ वातावरण आणि ( Untimely rains) अवकाळी पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून (Marathwada) मराठवाड्यासह राज्यभर ढगाळ वातावरण होते. मात्र, रविवारी रात्रभर अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे रब्बीतील उर्वरीत पेरण्या तर लांबणीवर पडणारच आहेत पण ज्वारी वगळता इतर पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढणार आहे.
खरिपात झालेले नुकसान बाजूला सारून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरणीवर लक्ष केंद्रित केलेले आहे. मात्र, नोव्हेंबर अंतिम टप्प्यात असतानाही सरासरीच्या निम्म्या क्षेत्रावरही रब्बीचा पेरा झालेला नाही. सातत्याने होत असलेल्या अवकाळी पावसामुळे पेरण्या लांबणीवर पडत आहेत. याचा परिणाम भविष्यात उत्पादनावरही होणार आहे. मात्र, अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी हे देखील तेवढेच महत्वाचे आहे.
सध्या कापसू वेचणीची कामे सुरु आहेत. मात्र, मराठवाड्यासह विदर्भात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. अशातच कापसाची वेचणी सुरु ठेवली तर बोंडाचे नुकसान होणार आहे. शिवाय बोंडगळतीचा धोका हा वाढणार आहे. आगोदरच बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने बोंडाचा दर्जा हा ढासळलेला आहे. त्यामुळे उत्पादनात तर घट होणारच आहे पण कापसाचा दर्जेदार पिक पदरात पाडून घ्यावयाचे असेल तर निरभ्र वातावरणातच वेचणी केलेली उत्तम राहणार आहे.
खरिपातील तूरीची अवस्था आता शेंगपोसण्याच्या अवस्थेत आहे. मध्यंतरीच्या अतिवृष्टीमुळे नाही पण आता ऐन काढणीच्या दरम्यानच आता ढगाळ वातावरण आणि पावसामुळे मारुका अळीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फ्लूबेंडामाइड 20 डब्ल्यूजी 6 ग्रॅम किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यू.पी 20 ग्रॅम किंवा नोवलुरोन 5.25 इंडोक्झाकार्ब 4.50 एससी 16 मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ही फवारणी पॉवरस्प्रेने फवारणी करावी. दुसरऱ्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाची मात्रा ही तिप्पट करावी लागणार आहे. दुसऱ्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकांची अदलाबदल करावी. उपरोक्त किटकनाशकांसोबत इतर कीटकणशके, बुरशीनाशके, संप्रेरके, खते, अन्नद्रव्ये इत्यादी मिसळू नये.
सध्या रब्बी हंगमातील पेरणीची लगबग सुरु आहे. मात्र, ढगाळ वातावरण आणि होत असलेल्या अवकाळी पावसामुळे पेरण्या ह्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे पेरणीला उशीर होणार आहे तर याचा उत्पादनावरही परिणाम होणार आहे. तर सध्या हरभरा राजमा, करडई या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढणार आहे. करडईवर ऊंटअळी आणि मावा याचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे पेरणी झाली की, रोगराईचे प्रमाण वाढत असल्याने याचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकचे पैसे हे खर्ची करावे लागणार आहेत.
सध्या द्राक्ष काढणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, ढगाळ वातावरणामुळे घडामाध्ये पावसाचे पाणी शिरत असल्याने द्राक्ष हे सडत आहेत. पुणे, इंदापूर या भागातील शेतकऱ्यांचे मध्यंतरीच्या अवकाळीच्या पावसामुळे नुकसान झाले होते. तर रविवारी मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली असल्याने द्राक्ष बागेंचे नुकसान होणार आहे. शिवाय आंब्याला मोहर लागलेला मात्र, वातावरणातील बदलामुळे हा मोहर गळत आहे. 1 नोव्हेंबरपासून आंब्याचे नुकसान होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस हा खरीपासह रब्बी आणि फळबागांसाठीही धोक्याचा आहे.
रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला उशीर झाला असला तरी पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांनी ज्वारी पेरणीवर भर दिला होता. त्यामुळे मराठवाड्यात 60 टक्के क्षेत्रावर ज्वारीचा पेरा झाला आहे. त्यामुळे ज्वारी पिकाची उगवण झाली आहे. आता पावसामुळे ज्वारीची वाढ ही अधिक जोमाने होणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.