औरंगाबाद : दरवर्षी इतर फळपिकांच्या दरात कमी-अधिकपणा हा ठरलेलाच आहे. मात्र, मोसंबीचे भाव हे कायम चढेच राहिलेले असतात. यंदा मात्र, बदलत्या वातावरणाचा फटका मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनाही बसलेला आहे. टनामादगे तब्बल 40 ते 50 हजार रुपयांची घसरण झाली आहे. वातावरण बदल्याने मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचाच परिणाम हा दरावर झाला असून व्यापाऱ्यांनी मागेल त्या दरात फळबागा देण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावलेली आहे. केवळ 5 ते 15 हजार रुपये प्रतिटनाने मोसंबीची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे होत असलेले नुकसान आणि उत्पन्न पाहता हंगामी कापूसच बरा असे म्हणण्याची वेळ आली आहे.
गेल्या 8 ते 10 वर्षापासून मराठवाड्यात दुष्काळी परस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पाण्याची भीषण टंचाई असताना शेतकऱ्यांनी टॅंकरच्या पाण्यावर बागा जोपासल्या होत्या. तर अनेकांनी बागाची मोडणीही केली होती. आता गेल्या वर्षीपासून अधिकच्या पावसामुळे या बागांना फायदा होण्याऐवजी अधिकचे नुकसानच होत आहे. हलक्या प्रतिच्या जमिनीवरील बागेला या पावसाचा फायदा झाला आहे. पण चांगल्या प्रतिच्या जमिनक्षेत्रावर पावसाचे पाणी अधिकचे काळ राहिल्याने मोठे नुकसान झाले आहे.
काळाच्या ओघात मराठवाड्यातही पीक पध्दतीमध्ये मोठा बदल होत आहे. चार महिन्यांपूर्वी मोसंबी 50 ते 55 हजार रुपये प्रतिटन विकली जात होती. मोसंबीला विक्रमी दर मिळाल्यामुळे पुन्हा बागांना शेतकऱ्यांनी नवसंजीवनी देत दुप्पट उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, निसर्गाचा लहरीपणा पाहून पुन्हा मोसंबीचे क्षेत्र घटणार असे चित्र आहे. दक्षिण भारतामधून मोठ्या प्रमाणात मोसंबीची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील मोसंबीला मागणीच राहिलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांनाच बाजारात बसून विक्री करावी लागत आहे.
उत्पादनाच्या अपेक्षेने मराठवाड्यातील जालना जिल्ह्यांमध्ये फळबागाचे क्षेत्र वाढत आहे. मात्र, येथील बाजारपेठेत दिल्ली, अहमदाबाद, सुरत, आग्रा, नागपूर हैदराबाद आदी बाजारपेठेतून आवक वाढलेली आहे. त्यामुळे स्थानिक मोसंबीवर त्याचा परिणाम झाला आहे. शिवाय मोसंबी ही नाशवंत असल्याने अधिक काळ टिकवून ठेवता येत नाही. वातावरणातील बदल आणि इतर राज्यातून वाढत असलेली आवक यामुळे कापूसच बरा असे म्हणण्याची वेळ आली आहे. शिवाय अजूनही दोन महिने अशीच अवस्था राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.