नवी दिल्ली: महाराष्ट्र (maharashtra), दिल्लीसह देशातील अनेक राज्यात जोरदार पाऊस (Rainfall) सुरू आहे. सप्टेंबर महिना संपत आला तरी काही राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून तर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे प्रशासनाला काही ठिकाणी शाळा (school) बंद ठेवाव्या लागल्या आहेत. काही ठिकाणी रस्ते पाण्यात गेले आहेत. त्यामुळे लोकांचा संपर्क तुटला असून त्यांना येण्याजाण्यास अडचणी येत आहेत. मात्र, पावसाळा संपला तरी सप्टेंबरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस का होत आहे? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. त्यामागच्या कारणांचा घेतलेला हा आढावा.
साधारणपणे सप्टेंबर सुरू होण्यापूर्वीच पावसाळा संपतो. सप्टेंबरमध्ये तुरळक प्रमाणात सरी कोसळतात. परतीचा पाऊस येतो आणि जातो. पण मुसळधार पाऊस होत नाही. मात्र, यंदाही सप्टेंबरमध्येच पावसाने जोर धरला आहे. देशातील अनेक भागातील पावसाचा पॅटर्न बदलला आहे. काही ठिकाणी तर पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्यावर्षीही सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला होता.
खरं तर पाऊस होण्याचे आणि न होण्याची अनेक कारणे असतात. पाऊस होण्यामागे कोणतंही एखादं कारण नसतं. सप्टेंबरमध्येही पाऊस होत असल्याने त्यामागे कोणतंही एक कारण नाही, असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे. वेगवेगळ्या भागात होणाऱ्या पावसामागे वेगवेगळी कारणं असतात. ला निनामुळे गेल्या काही वर्षांपासून सप्टेंबरमध्ये पाऊस होत असल्याचं सांगितलं जात आहे. प्रशांत महासागराच्या मध्यामध्ये शीत सवातावरण असल्याने पाऊस अधिक होतो.
सध्या इक्वेटोरियल पॅसिफिक रिजनमध्ये ला निनाची स्थिती आहे. ही परिस्थिती वर्ष अखेरपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. यंदा हिवाळ्यातही पाऊस होण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.
पाऊस होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे कमी दाबाचा पट्टा आणि तापमान आहे. जेव्हा उष्णता वाढते तेव्हा हवेचा दाब कमी होतो. त्यामुळे हवा वरच्या दिशेने जाते. त्यामुळे अधिक दाबाचा पट्टा असलेल्या परिसरातील ढग अपेक्षेनुसार कमी दाबाच्या परिसरात जातात. त्यामुळे पाऊस होतो.