पुणे : यंदा हंगामाच्या सुरवातीपासून (Kharif Season) खरिपावर निसर्गाची अवकृपा राहिलेली आहे. सुरवातीला वेळेवर वरुणराजाचे आगमन झाले नाही. त्यामुळे जूनच्या पंधरवाड्यात होणाऱ्या पेरण्या थेट जुलैच्या पहिल्या आठवड्यात झाल्या होत्या. शिवाय पेरणी होताच अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने पिके पाण्यात होती. प्रतिकूल परस्थितीमुळे उत्पादनात घट निश्चित मानली जात आहे. पावसाने उघडीप दिल्यावर ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भावही वाढला होता. हे सर्व झाल्यानंतर (Agricultural Department) कृषी विभागाने आता (Kharif Crop) खरीप पिके उत्पादन वाढीसाठीची मोहिम सुरु केली आहे. त्यामुळे या मोहिमेचा नेमका काय फायदा होईल असा प्रश्न पडला आहे. 17 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत या मोहिमेचे आयोजन केले होते. शेतकऱ्यांच्या हातून सर्वकाही गेल्यानंतर दिलेला सल्ला काय उपयोगाचा असा सवाल उपस्थित होत आहे.
खरीप हंगामातील उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने ज्या भागात अधिकचे पीक घेतले गेले त्यानुसार मार्गदर्शन पार पडले आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात भात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात पिकासाठी युरिया ब्रिकेट खताचा वापर, कीड रोग नियंत्रण याबाबत मार्गदर्शन केले आहे. शिवाय कपाशीच्या पिकांमध्ये कामगंध सापळे लावून किडीपासून पिकांचा बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. पण हे सर्व करण्यासाठी कृषी विभागाला उशीर झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
यंदा पुणे जिल्ह्यात धान पिकांमध्ये वाढ झालेली आहे. क्षेत्र वाढीबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढावे यासाठी कृषी विभागाने यंदा अभिनव उपक्रम राबवला आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना धानाचे उत्पादन वाढवावे कसे याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी वापरायचा युरिया, किड रोग निंयत्रणासाठी काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले गेले आहे. शिवाय आगामी काळात नियोजन कसे असावे याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कृषी विभागाने केलेल्या मार्गदर्शनाचा कितपत फायदा होणार हे पहावे लागणार आहे.
राज्यात पावसाने उघडीप देताच यामधून शेतकऱ्यांना सावरता यावे यासाठी कृषी विभागाने यंदा अनोखा फंडा राबवला आहे. केवळ उत्पादन वाढीसाठी एक मोहिम राबवली जात आहे. यामध्ये त्या भागातील मुख्य पिकांनुसार मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना कितपत होणार हे पहावे लागणार आहे.