जगातील सर्वाधिक प्रदूषित (polluted) शहरांच्या यादीत भारतीय शहरांचा क्रमांक लागतो, हे अत्यंत लाजिरवाणे सत्य आहे. म्हणूनच एका भारतीय स्टार्टअपने दुचाकी चालकांना प्रदूषित हवेपासून वाचवण्यासाठी खास हेल्मेट तयार केले आहे. हेल्मेट (Helmet) स्वतःच हवा शुद्ध करीत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हिवाळ्याच्या काळात हवेची स्थिती सर्वाधिक बिघडते. याचा लोकांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो आणि अनेक लोकांचा यामुळे मृत्यूही होतो. त्यामुळे, एअर प्युरिफायर असलेले हेल्मेट (Air purifier helmet) स्कूटर-बाईकस्वारांना खूप दिलासा देणारे ठरणार आहे.
जगभरात प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. भारतातही एअर प्युरिफायरची मागणी वाढत आहे. आता तर कार कंपन्याही नवीन कारमध्ये केबिन एअर प्युरिफिकेशन सिस्टम बसवत आहेत. मात्र, दुचाकी चालकांबाबत अशी कुठलीही सोय झाली नव्हती. पण एका भारतीय स्टार्टअपने असे हेल्मेट तयार करण्यात यश मिळवले आहे, जे रायडरचे संरक्षण करण्यासोबतच हवा शुद्ध करते.
स्कूटर आणि बाइकस्वारांना भारतीय रस्त्यांवरील सर्वात भयानक प्रदूषणाचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत 80 टक्के प्रदूषक घटक फिल्टर करण्याचा दावा करत एअर प्युरिफायर असलेले हेल्मेट बाजारात उपलब्ध आहे. एचटी ऑटोच्या मते, भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्या अहवालात लिहिले आहे, की हे हेल्मेट दुचाकीस्वारांना श्वास घेण्यासाठी ताजी व शुध्द हवा देण्यास सक्षम आहे.
एअर प्युरिफायरसह हेल्मेटच्या डिझाइनबद्दल सांगायचे तर, त्यात एअर प्युरिफिकेशन युनिट बसविण्यात आले आहे. हे बदलता येण्यासारखे फिल्टर असून यात, बॅटरीवर चालणारा पंखा बसवला आहे. हेल्मेटचे एअर प्युरिफायर 6 तासांपर्यंत टिकू शकते. युजर्स हे हेल्मेट मायक्रो युएसबी स्लॉटद्वारे देखील चार्ज करू शकतात. हे हेल्मेट बाजारात 4,500 रुपयांना उपलब्ध आहे.