मुंबई : पेट्रोल अन् डिझेलचे वाढते दर त्याच सोबत पर्यावरणीय समस्या आदींमुळे अनेक लोक सीएनजी तसेच इलेक्ट्रिक वाहनांकडे वळले आहेत. लोकांची पसंती पाहून ऑटोमोबाईल उद्योगानेही मोठ्या प्रमाणावर सीएनजी आणि हायब्रीड तंत्रज्ञानावर काम सुरू केले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी (CNG) आणि हायब्रीड (Hybrid) तंत्रज्ञान हे ग्रीन फ्यूअल (Green Fuel) म्हणून चांगला पर्याय मानला जातो. सीएनजीच्या किमतीही थोड्या स्वस्त असून पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत हा एक चांगला पर्याय मानला जातो. त्याच सोबत हायब्रीड तंत्रज्ञान इलेक्ट्रिक पॉवरट्रेन वापरून मोठ्या प्रमाणात इंधन वाचवण्यास सक्षम आहे. या लेखाच्या माध्यमातून सीएनजी आणि हायब्रिड तंत्रज्ञानातील फरक समजून घेऊया.
सीएनजी आणि हायब्रीड कार या दोन्ही प्रकारातही पारंपरिक इंधन वापरता येते. सीएनजी कारचे इंजिनही पेट्रोलवर चालते. त्याच वेळी, हायब्रिड टेक्नोलॉजी पेट्रोलवर चालणारी कार आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक कारमधील अंतर कमी करण्यासाठी कार्य करते. हायब्रीड कारचे इंजिन पेट्रोलवर चालते, तर बॅटरी पॅक आणि मोटर इलेक्ट्रिक कारची कमतरता भरून काढतात.
सीएनजी वाहने सीएनजी किटसह येतात व पेट्रोल इंजिनवर काम करतात. सीएनजी किट आफ्टरमार्केट म्हणजेच कॉमन मार्केटमधूनही बसवता येते. भारतात, मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि टाटा मोटर्स सारख्या कंपन्या देखील कारखान्यातूनच प्री-इंस्टॉल केलेल्या सीएनजी किटसह कार विकतात.
सीएनजी वाहनांमध्ये सीएनजीची टाकी वाहनाच्या मागील बाजूस बसविली जाते. या गाड्यांचे पेट्रोल डिझाईन अशा प्रकारे तयार करण्यात आले आहे की ते सीएनजी आणि इंधन दोन्हींवर काम करु शकते. एका वेळी एकच प्रकारावर गाडी चालवते. सीएनजी कार चालवण्यासाठी कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस वापरला जातो.
हायब्रिड टेक्नोलॉजीमध्ये विविध उर्जेचा वापर केला जातो. परंतु सामान्यत: यात इलेक्ट्रिसिटी व तेल यांचे मिश्रण वापरण्यात येत असते. हायब्रिड वाहने इंधनावर आधारित इंजिनसह येत असून ज्यात इलेक्ट्रिक मोटर देखील असते. बाजारात तीन प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जात असून त्यात, फूल हायब्रीड, माइल्ड हायब्रीड आणि आणि प्लग-इन हायब्रीडचा समावेश आहे.