कारमधून प्रवास करत असताना अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. वाहतूक नियमांचं पालन तर केलंच पाहिजे. सुरक्षित ड्रायव्हिंगही केली पाहिजे. पण सोबत काही महत्त्वाची कागदपत्रेही ठेवली पाहिजे. वाहतूक पोलिसांनी मागितल्यावर ही कागदपत्रे तुम्हाला कधीही देता आली पाहिजे. नाही तर तुम्हाला दंड बसलाच म्हणून समजा. कागदपत्रे सोबत नसतील तर किमान 10 हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो. कार चालवताना एखादी दुर्देवी घटना घडली. अपघात झाला तर याच कागदपत्रांच्या आधारे तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचणं सोपं जातं. कोण कोणती डॉक्युमेंट्स सोबत ठेवली पाहिजे, त्यावर टाकलेला हा प्रकाश.
मोटर वाहन अधिनियम 1988 आणि केंद्रीय मोटर नियम 1989 च्या अनुसार, रस्त्यावरून वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे. या कागदपत्रातून तुमची ओळख, राष्ट्रीयता, वय आणि इतर ओळख पटली जाते. ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर कोणत्याही विशेष परमिट शिवाय तुम्ही देशातील कानाकोपऱ्यात ड्रायव्हिंग करू शकता. तुम्ही देशातील कोणत्याही राज्यात गेला तरी तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स वैद राहतं. तसेच एखादी दुर्घटना घडली तर ड्रायव्हिंग लायसन्स असलंच पाहिजे. त्याशिवाय तुमचा विमा क्लेम होणार नाही.
कार चालवणाऱ्याच्या नावावर कार आहे की नाही हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट किंवा आरसी पुरावा म्हणून काम करतात. वाहतूक निरीक्षकही ही कार आरटीओमध्ये रजिस्टर आहे की नाही याची खात्री करून घेत असतात. कार किंवा बाइकचा बीमा क्लेम करतेवेळी आरसी एक महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. विमा क्लेम करणाऱ्याच्या वाहन आणि दाव्याची वास्तविकता सिद्ध करण्यासाठी हा दस्ताऐवज अत्यंत महत्त्वाचा आहे. आरसीमध्ये गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर, मालकाचं नाव, मॅन्युफॅक्चरींग टाइप आणि कारचा प्रकार, कारच्या उत्पादनाचं वर्ष, नोंदणी तारीख, अंतिम तारीख, चेसिस नंबर, इंजिन नंबर आदी माहिती असते.
1988 च्या मोटर वाहन अधिनियमानुसार, जर तुम्ही तुमची कार चालवत असाल तर तुमच्याकडे विमा पॉलिसी असणं आवश्यक आहे. ही पॉलिसी तुम्हाला थर्ड पार्टी बीमा कव्हरेज देते. म्हणजे तिसऱ्या पक्षाचे व्यक्ती, वाहन किंवा संपत्तीचं नुकसान झालं तर वित्तीय स्थितीला संरक्षण दिलं जातं.
पीयूसी सर्टिफिकेट तुमच्या वाहनातील कार्बनच्या उत्सर्जनाची लेव्हल किती आहे याची माहिती देणारं डॉक्यूमेंट आहे. वाढत्या प्रदूषणामुळे काही प्रमाणात वाहनांचं उत्सर्जन वाढतं. त्यासाठी पीयूसी सर्टिफिकेट असावं लागतं. तुमची कार निर्धारित काळापर्यंत कार्बन उत्सर्जन करते आणि नियम तसेच इतर मानकांचं पालन केलं जातं हे या सर्टिफिकेटमधून सिद्ध होतं. जर, तुम्हाला वाहतूक पोलिसांनी पकडलं आणि तुमच्याकडे पीयूसी सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला 10 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. किंवा सहा महिन्याचा तुरुंगवास होऊ शकतो. किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
कार चालवताना पॅन कार्ड आणि आधार कार्ड सारखे डॉक्यूमेंट्स सोबत असणं बंधनकारक नाही. पण विभिन्न परिस्थितीत ही कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची असतात. त्यासाठी तुम्ही डिजी लॉकर आणि एणपरिवहन अॅप सारखे डिजिटल डॉक्युमेंट स्टोरेज प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता.