नवी दिल्ली: जगातील सुप्रसिद्ध फोर्ड ही वाहन उत्पादक कंपनी भारतामधील आपला व्यवसाय बंद करणार आहे. गेल्या बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत FORD कंपनीच्या वाहनांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळेच फोर्ड कंपनीने भारतामधील आपले दोन्ही उत्पादन प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत फोर्डची कोणतीही नवीन गाडी आली नव्हती. त्यामुळे कंपनी भारतातील व्यवसाय गुंडाळण्याच्या विचारात होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झाले आहे. चेन्नई आणि गुजरातच्या साणंद येथे फोर्ड कंपनीचे उत्पादन प्रकल्प आहेत. याठिकाणी इकोस्पोर्ट, फिगो आणि एस्पायर या गाड्यांची निर्मिती केली जाते. या प्रकल्पांमध्ये फोर्डने तब्बल 2.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती.व्यवसाय पुर्नरचना योजनेंतर्गत भारतात कंपनीकडून फक्त आयात केलेली वाहने विकली जाणार आहेत. सुमारे 4000 भारतीय कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे.
US auto major Ford to shut down both its manufacturing plants in India, to sell only imported vehicles in the country going ahead: sources
— Press Trust of India (@PTI_News) September 9, 2021
बऱ्याच काळापासून फोर्ड कंपनी भारतात मोठे नुकसान सहन करत आहे. त्यामुळे आता फोर्ड कंपनी आपल्या काही कार आयात करुन देशात विकत राहील. तसेच डिलर्सना विद्यमान ग्राहकांना सेवा देण्यासाठी देखील मदत करेल.
फोर्ड आणि महिंद्र यांनी भागीदारी करणे अपेक्षित होते. तथापि, 1 जानेवारी 2021 रोजी दोन्ही निर्मात्यांनी सौहार्दपूर्ण घोषणा केली की, जॉइंट वेंचर बंद आहे आणि दोन्ही उत्पादक स्वतंत्र मार्गाने जातील. फोर्ड आणि महिंद्रा वाटाघाटीच्या प्रगत टप्प्यावर असताना, इतर उत्पादकांशी करार तयार करण्याच्या चर्चेनंतर फोर्ड शांत बसली. जॉइंट वेंचर यशस्वी झाला असता, तर फोर्डच्या मरायमलाई नगर आणि सानंद प्लांटमध्ये उत्पादन दरवर्षी सुमारे 40,000 युनिट्स झाले असते. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बहुतेक उत्पादकांचे देशात मोठे नुकसान झाले आहे. बाजारपेठ संकुचित झाली आहे, ज्यामुळे कारखाने त्यांच्या एकूण क्षमतेपेक्षा कमी काम करीत आहेत.
फोर्ड ही जगातील सर्वात जुन्या वाहननिर्माता कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी दोन महायुद्धांची साक्षीदार राहिली आहे. तब्बल 125 वर्ष जुन्या असलेल्या या कंपनीची सूत्रे अजूनही फोर्ड परिवाराकडेच आहेत.
संबंधित बातम्या:
ऑटोमोबाईल कंपन्यांचा कर्दनकाळ ठरलेलं ग्लोबल चिप शॉर्टेज प्रकरण नक्की आहे तरी काय?
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, ‘या’ कारणामुळे सर्वच वाहन कंपन्या तोट्यात