मुंबई : लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांमध्ये एअरबॅग्ज दिल्या जातात. या एअरबॅग्ज रस्ते अपघातावेळी कारमध्ये बसलेल्या प्रवाशांचे प्राण वाचवतात. हल्ली बहुतांश वाहनांमध्ये एअरबॅग येऊ लागल्या आहेत. केंद्र सरकारही सातत्याने एअरबॅग्सबद्दलचे नियम कठोर करत आहे. पण जर एअरबॅगमध्येच दोष असेल तर? एअरबॅगमध्ये दोष आढळल्याने किया (Kia) कंपनीने आपल्या 4.10 लाख गाड्या परत मागवल्या आहेत. अपघाताच्या वेळी एअरबॅग न उघडण्याच्या भीतीने त्यांनी या गाड्या परत मागवल्या आहेत. किआच्या अनेक गाड्या या मोठ्या रिकॉलमध्ये सामील आहेत, ज्यात ईव्ही कारचादेखील (EV car) समावेश आहे. Kia ने आतापर्यंत भारतात चार कार सादर केल्या आहेत आणि त्या ह्युंडई (Hyundai) आणि मारुती (Maruti) सारख्या ब्रँडशी स्पर्धा करतात.
2017 Kia Forte Coupe , 2017-18 किआ फोर्टेस, 2017-19 किआ सेडोनास, 2017-19 किआ सोल आणि 2017-19 किआ सोल ईव्ही या गाड्यांचा या रिकॉलमध्ये समावेश करण्यात आला आहे. या वाहनांमधील एअरबॅग कंट्रोल युनिट प्रिंटेड सर्किट बोर्डवरील मेमरी चिपच्या संपर्कात येऊन इलेक्ट्रिकल सर्किट खराब करू शकते. अशा परिस्थितीत, टक्करीदरम्यान (धडक) एअरबॅग सक्रिय होणार नाहीत, ज्यामुळे अपघातात कारचालक आणि प्रवासी जखमी होण्याची शक्यता वाढते. राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा प्रशासनाच्या मदतीने ही माहिती मिळाली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतात उपलब्ध असलेल्या कार या रिकॉलमध्ये समाविष्ट नाहीत.
सर्व प्रभावित Kia वाहनांचे मालक त्यांची कार जवळच्या डीलरकडे घेऊन जाऊ शकतात आणि त्यांचे वाहन तपासू शकतात. तपासणी दरम्यान, एअरबॅग कंट्रोल युनिटचे निरीक्षण केले जाईल आणि हे युनिट बदलण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे काम विनामूल्य केले जाईल. याशिवाय ग्राहक 31 मार्चपर्यंत Kia च्या अधिकृत ग्राहक सेवेवर कॉल करून त्यांचे वाहन तपासण्यासाठी टाईम बुक करू शकतात.
या महिन्यात, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक ट्विट केले आहे की, 8 प्रवासी क्षमता असलेल्या मोटार वाहनांसाठी किमान सहा एअरबॅग अनिवार्य करण्याच्या मसुद्याच्या GSR अधिसूचनेला मंजुरी दिली आहे. M1 वाहन श्रेणीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, कारण पुढील आणि मागील रांगेतील प्रवाशांसाठी चार अतिरिक्त एअरबॅग प्रदान करणे बंधनकारक आहे, जेणेकरुन कार पुढच्या बाजूने कुठेही धडकली अथवा कारला मागून कोणत्याही वाहनाने धडक दिली तर त्या टक्करीचा प्रभाव कमी करता येईल.
या वाहनांमध्ये टू/साइड टोरसो एअरबॅग्ज आणि टू साइड कर्टेन/ट्यूब एअरबॅग्ज मिळतील. या एअरबॅग्जमुळे कारमधील सर्व प्रवाशांना संरक्षण मिळेल ज्यामुळे त्यांना सुरक्षितता मिळेल. भारतातील मोटार वाहने पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
इतर बातम्या
Budget 2022 : दुचाकी स्वस्त होणार? GST कमी करण्याची ऑटोमोबाईल डीलर्सची मागणी
(Kia recalls more than 410000 vehicles over airbags may not deploy)