देशातील प्रमुख दुचाकी निर्माता कंपनी टीव्हीएसने (TVS) या वर्षी एप्रिल आणि जूनमध्ये सर्वाधिक जास्त रेव्हेन्यू (Revenue) जनरेट केला आहे. रिपोर्ट्सनुसार कंपनीने घोषणा केली आहे, की गेल्या वर्षी या दरम्यान टीव्हीएसचा ऑपरेटिंग रेव्हेन्यू 3934 कोटी होता; तो आता वाढून 6009 कोटी रुपये झाला आहे. हा टीव्हीएसचा आतापर्यंतचा सर्वाधिक रेव्हेन्यू मानला जात आहे. पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टॅक्सच्या आधी प्रोफीट 432 कोटी रुपये राहिला आहे. तर मागील वर्षी पहिल्या तिमाहीमध्ये प्रोफीट (Profit) केवळ 102 कोटी रुपये होता. तर दुसरीकडे टॅक्सनंतर कंपनीचा प्रोफीट 321 कोटी रुपये नोंदविण्यात आला होता. यंदा टीव्हीएसने दुचाकी आणि तीन चाकीची एकूण 9.07 लाख युनिट्सची विक्री केली आहे.
या वर्षी पहिल्या तिमाहीमध्ये टीव्हीएसने दुचाकींची एकूण 4.34 युनिटची विक्री केली आहे. तर दुसरीकडे कंपनीने मागील वर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्ये स्कूटरची 1.38 लाख युनिटच्या तुलनेत यंदा 3.06 लाख युनिटची विक्री केली आहे. स्कूटर सेगमेंटमध्ये पाहिल्यास कंपनीने डबलपेक्षाही जास्त विक्री केली असल्याचे दिसून येत आहे. टीव्हीएसने स्थानिक बाजारामध्ये चांगली कामगिरी केल्याचे दिसून येत आहे.
इलेक्ट्रिक स्कूटरबाबत बोलायचे झाल्यास, टीव्हीएसने मागील वर्षी एप्रिल आणि जूनमध्ये केवळ 1 हजार युनिटची विक्री केली होती. परंतु या वेळी कंपनीने यात 900 टक्के वाढ केली आहे. कंपनीने 9 हजार इलेक्ट्रिक स्कूटर युनिटची विक्री केली आहे. 2022-23 च्या पहिल्या तिमाहीमध्ये टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्यात आली आहे. ही स्कूटर तीन व्हेरिएंटमध्ये येते असून सिंगल चार्जवर 140 किमीची रेंज मिळवू शकते.
नुकतेच लाँच झालेल्या TVS NTORQ XT मध्ये इंडस्ट्रीचा पहिला हायब्रिड टीएफटी कंसोल दिले आहे. या स्कूटरमध्ये 60 पेक्षाही जास्त हायटेक फीचर्स देण्यात आले आहे. टीव्हीएसने रोनिन स्क्रँबलरलाही लाँच केले आहे. याची सुरुवातीची एक्सशोरुम किंमत 1.68 लाख रुपये आहे. टीव्हीएस रोनिनची स्पर्धा अपकमिंग रॉयल एनफील्ड हंटर 350 आणि येजदी स्क्रँबलरशी होणार आहे.