नवी दिल्ली | 12 जानेवारी 2024 : गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला आकाश रंगबिरंगी पतंगांनी भरुन गेल्याचे दिसले असेल. रस्त्यावरुन मुलांच्या टोळ्या कापलेला पतंग पकडण्यासाठी पण दिसल्या असतील. मकर संक्रांत तोंडावर आली आहे. मकर संक्रांतीला पतंग उडवला जातो. पण पतंग उडवताना मांजामुळे पशू-पक्षीच नाही तर दुचाकीस्वारांना जीव गमविण्याची वेळ येते. विविध प्रकारच्या मांजामुळे कोणाचा गळा, हात, बोटं, कान, नाक, भूवया कापल्याचे अनेक प्रकार या काळात समोर येतात. हा दोर अनेकांच्या जीवाला घोर लागतो. त्यापासून वाचण्यासाठी दुचाकीस्वार स्वस्तातील हे उपाय करु शकतात.
अनेकदा ओढावतो मृत्यू
मांज्यामुळे अनेकदा दुचाकीस्वारांच्या जीवावर बेतते. अनेकदा बाईक अथवा स्कूटर चालविणाऱ्यांच्या गळ्यावर खोल जखम झाल्याने जीव जाण्याची शक्यता असते. या काळात वाहन चालकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. अशावेळी स्वतःला वाचविण्यासाठी काय उपाय करावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. सरकारने चायनीज मांजावर बंदी घातली असली तरी छुप्या पद्धतीने त्यांची विक्री केली जाते. त्यामुळे अशावेळी स्वतःला वाचविण्यासाठी हा देशी जुगाड कामी येऊ शकतो.
स्वतःला वाचविण्यासाठी घ्या ही काळजी
बाईक अथवा स्कूटरवर बाहेर पडताना स्टेनलेस स्टीलचे हलके वायर तुमच्या उपयोगी पडू शकतात. हे सेफ्टी वायर तुम्हाला टू व्हीलरच्या हँडलवर फीट करता येतात. त्यामुळे एखादा मांजा तुमच्याकडे येत असेल तर तो अगोदर या वायराला लागेल आणि त्याची माहिती तुम्हाला अगोदरच मिळेल.
वाईजर बसवा
सेफ्टी वायर भेट नसेल तर अजून एक जुगाड आहे. ऑटो एक्सेसरीज मिळणाऱ्या दुकानात वायझर खरेदी करा. कोणत्याही मॅकेनिकडून हे वायजर तुम्हाला बाईकवर लावता येईल. त्यामुळे मांजापासून तुमचे संरक्षण होईल.