संपूर्ण जगात सेमीकंडक्टर चिपचा जबरदस्त तुटवडा निर्माण झालेला आहे. याचा परिणाम ऑटोमोबाईल (Automobile) कंपन्यांवर होत आहे. कंपन्यांना मोठ्या संख्येने कार बनविण्यासाठी चिपचा तुटवडा सहन करावा लागत आहे. परंतु असे असतानाही मे 2022 मध्ये समोर आलेल्या आकड्यांनुसार, विविध कंपन्यांनी कार विक्रीच्या बाबतीत चांगली कामगिरी केलेली दिसून येत आहे. मारुती सुझुकी (Maruti Suzuki) 42.29 टक्के मार्केट शेअर्सने सतत आघाडीवर आहे. तर दुसरीकडे टाटा मोटर्सने (Tata Motors) चांगली कामगिरी करीत ह्युंदाईला टक्कर देत दुसर्या क्रमांकावर आपले स्थान पक्के केले आहे. मे 2022 मध्ये एकूण 294342 युनिटची विक्री करण्यात आली आहे. तर मागील वर्षी मे 2021 मध्ये फक्त 103022 युनिटची विक्री करण्यात आली होती.
मारुती सुझुकीने या वेळीही देशात सर्वाधिक कार विक्री करत आपले पहिले स्थान अबाधित ठेवले आहे. मे 2022 मध्ये कंपनीने एकूण 124474 युनिट विकून भारतात पहिला क्रमांक मिळविला आहे. या दरम्यान कंपनीने 278.31 टक्क्यांची ग्रोथ मिळविली आहे. तर मे 2021 मध्ये कंपनीने केवळ 32093 युनिटची विक्री केली होती. या वेळी कंपनीने 91571 युनिट जास्तीची विक्री करुन बाजारात 42.29 टक्के हिस्सेदारी कायम ठेवली आहे.
टाटा मोटर्सने या वेळी चांगली कामगिरी केली आहे. मे 2022 मध्ये टाटा मोटर्सने ह्युंदाईला मागे टात देशात दुसरा क्रमांक मिळविला आहे. कंपनीने मागील महिन्यात 43341 कारची विक्री करुन 185.50 टक्के ग्रोथ मिळविली आहे. तर मे 2021 मध्ये 15181 युनिटचीच विक्री करण्यात आली होती. टाटा मोटर्सने गेल्या वर्षी मेच्या तुलनेत या वर्षी 28160 युनिटची विक्री करुन 1472 एवढे मार्केट शेअर मिळविले आहे.
कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चांगली कामगिरी केली आहे. परंतु असे असतानाही मे 2022 मध्ये 42294 युनिट विकूनही कंपनी दुसर्या क्रमांकावरुन घसरुन तीसर्या स्थानावर पोहचली आहे. कंपनीने मे 2021 मध्ये 25001 युनिटची विक्री केली होती. गेल्या महिन्यात 17292 युनिट जास्त विक्री करुन कंपनीने मार्केटमध्ये 14.37 टक्के हिस्सा मिळवला होता.
मे 2022 मध्ये 26904 युनिटची विक्री करुन महिंद्राने चौथा क्रमांक मिळविला आहे. कंपनीने मे 2021 मध्ये केवळ 8004 युनिटची विक्री केली होती. यंदा कंपनीने 18900 युनिट जास्तीची विक्री करुन 236.13 टक़्के मोठी ग्रोथ मिळवली आहे. भारतीय कार बाजारात कंपनीची 9.14 टक्के मार्केट शेअर राहिले आहे.
किआ कंपनीने मे 2022 मध्ये 18718 कार्सची विक्री करुन भारतात पाचवा क्रमांक मिळविला आहे. मे 2021 मध्ये कंपनीने केवळ 11050 युनिट्सची विक्री केली होती. या वेळी यात 69.39 टक़्के ग्रोथ मिळवून किआने 7668 युनिट जास्तीची विक्री केली आहे. 6.36 टक्के मार्केट शेअर राहिले आहे.