Nitin Gadkari : नवीन कार विकत घेणाऱ्यांसाठी नितीन गडकरींची महत्त्वाची घोषणा, डिस्काऊंट मिळेल, पण…

| Updated on: Aug 28, 2024 | 9:08 AM

Nitin Gadkari : नवीन कार विकत घेणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. दिल्लीच्या भारत मंडपममध्ये नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली SIAM च्या सीईओ स्तराची एक बैठक पार पडली.

Nitin Gadkari : नवीन कार विकत घेणाऱ्यांसाठी नितीन गडकरींची महत्त्वाची घोषणा, डिस्काऊंट मिळेल, पण...
Follow us on

रस्त्यावर सध्या जी वाहन पळतायत, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या आहेच. पण प्रदूषणाचा स्तर हा देखील चिंतेचा विषय आहे. जुन्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. हे प्रदूषण मानवी आरोग्याला, पर्यावरणाला घातक आहेच. वाहन उद्योग, प्रदूषण या गोष्टी लक्षात घेऊनच केंद्र सरकारने एप्रिल 2022 पासून स्क्रॅपिंग धोरण लागू केलं. आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नव्या वाहन खरेदी संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. ग्राहकांना आता नव्या वाहन खरेदीवर डिस्काऊंट मिळणार आहे. पण त्यासाठी जुनं वाहन स्क्रॅप म्हणजे भंगारात काढल्याचं प्रमाणपत्र द्यावं लागेल. व्यावसायिक आणि प्रवासी वाहनांच उत्पादन करणाऱ्या कंपन्या अशा प्रकारची सवलत देण्यासाठी तयार असल्याच नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितलं.

दिल्लीच्या भारत मंडपममध्ये नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली SIAM च्या सीईओ स्तराची एक बैठक पार पडली. त्यात गडकरी यांनी वाहन उद्योग क्षेत्राला कुठल्या अडचणींचा सामना करावा लागतोय, ते समजून घेतलं. वाहनांची संख्या लक्षात घेता देशाला 1000 वाहन स्क्रॅपिंग सेंटर आणि 400 ऑटोमेटेड फिटनेस टेस्ट सेंटरची गरज असल्याच गडकरी मागच्यावर्षी म्हणाले होते. टीओआयच्या वृत्तनुसार, मोठ्या वाहन निर्मिती कंपन्यांकडून जुनी वाहन स्क्रॅप करुन नवीन वाहन विकत घेणाऱ्यांना 1.5 ते 3.5 टक्के डिस्काऊंट मिळू शकतो.


वाहन उद्योग, सर्क्युलर इकोनॉमी म्हणजे काय?

“राष्ट्रीय वाहन स्क्रॅपिंग धोरण सर्वच हिस्सेदारांच्या हिताच आहे. भारत दक्षिण आशियातील स्क्रॅपिंगची राजधानी बनू शकतो” असं नितीन गडकरी यांचं मत आहे. “सर्क्युलर म्हणजे वर्तुळाकर इकोनॉमी खूप महत्त्वाची असून यामुळे देशात रोजगार निर्मिती होईल” असं नितीन गडकरी म्हणाले. ऑगस्ट 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय वाहन स्क्रॅपिंग धोरण आणलं. अयोग्य, प्रदूषण करणारी वाहन टप्याटप्याने बाहेर काढायची आणि सर्क्युलर इकोनॉमीला प्रोत्साहन देणं हा या धोरणामागे उद्देश होता.