रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) 2022 च्या सुरुवातीलाच त्यांची नवीन मोटरसायकल Royal Enfield Scram 411 लाँच करणार आहे, असे आधीच सांगितले होते. परंतु असे दिसत आहे की कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेमुळे कंपनीच्या योजनांना ब्रेक लागला आहे. 22 फेब्रुवारीला लॉन्च होणारी मोटारसायकल आता मार्च महिन्यात सादर केली जाण्याची शक्यता आहे.
सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या तिसर्या लाटेने इतर अनेक वाहन निर्मात्यांना फटका बसला आहे. अनेक वाहनांचे लाँचिंग पुढे ढकलण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांना डिजिटल कार्यक्रमांची निवड करण्यास भाग पाडले आहे. स्क्रॅम 411 हे वर्ष 2022 साठी कंपनीचे पहिले लॉन्च असेल. हे मुळात रॉयल एनफिल्डच्या अत्यंत लोकप्रिय हिमालयन एडीव्हीवर आधारित असेल. आणि हे हिमालयन अॅडव्हेंचर मोटरसायकलचे रोड-आधारित व्हर्जन असेल.
अलीकडेच एका नवीन ड्युअल-टोन पेंट थीममध्ये पब्लिक रोडवर या बाईकची चाचणी घेण्यात आली. तेव्हा ही बाईक पहिल्यांदा पाहायला मिळाली. बाईकच्या प्रोटोटाइपमध्ये ड्युअल-टोन रेड-ब्लॅक फ्यूल टँक पाहायला मिळाला. तर उर्वरित बॉडी पॅनल काळ्या रंगात दिसले.
आगामी स्क्रॅम फॅमिली 411cc, सिंगल-सिलेंडर युनिटसह सुसज्ज असेल. हे इंजिन 24.3 bhp पर्यंत मॅक्सिमम पॉवर जनरेट करण्यासाठी ओळखले जाते. ट्रान्समिशन हिमालयनमध्ये आढळलेल्या इंजिनप्रमाणेच राहील. तसेच, हिमालयनमधील 21-इंच युनिटऐवजी स्क्रॅमला लहान 19-इंच फ्रंट व्हील मिळण्याची शक्यता आहे. तथापि, मागील चाक तेच 17 इंच स्पोक व्हील असेल.
लॉन्च केल्यावर स्क्रॅम 411 ची किंमत जवळपास 1.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) असण्याची शक्यता आहे. या वर्षी रॉयल एनफिल्डच्या इतर आगामी लॉन्चमध्ये हंटर 350 किंवा शॉटगन 650 (SG650) या बाईक्सचा समावेश असू शकतो.