नवी दिल्ली | 18 नोव्हेंबर 2023 : देशातील प्रमुख दुचाकी निर्मिती कंपनी होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने बाजारात एक दमदार बाईक उतरवली आहे. या बाईकने 350 सीसी सेगमेंटवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. होंडा कंपनीने भारतीय बाजारात आपली नवीन Honda CB 350 बाजारात आणली आहे. होंडाने या बाईकचे नाव एकदम साधं-सोपं ठेवले आहे. CB350 असं या बाईकचं नाव आहे. या सेगमेंटमध्ये सध्या रॉयल एनफिल्डची दादागिरी आहे. या सेगमेंटमध्ये रॉयल एनफिल्डचा 80 टक्के वाटा आहे. होंडा आता या नवीन दमदार बाईकच्या भरवशावर या सेगमेंटमध्ये घुसखोरी करणार आहे. कंपनीने या मोटारसायकलचे एकूण दोन व्हेरिंट्स लाँच केले आहे.
अशी आहे किंमत
होंडाच्या सीबी 350 डिलक्स मॉडेलची किंमत 1,99,900 रुपये तर डिलक्स प्रो मॉडेलची किंमत 2,17,800 रुपये असेल. ही एक्स शोरुम किंमत आहे. Honda ने या बाईकची किंमती प्रतिस्पर्धी कंपनीच्या तुलनेत कमी केलेल्या नाहीत. या सेगमेंटमध्ये होंडा दीर्घकालीन योजनेसह उतरली आहे, हे यावरुन स्पष्ट होते. ग्राहक ही बाईक कंपनीच्या बिगविंग डीलरशीपच्या माध्यमातून बुक करु शकतात. लवकरत या बाईकची डिलव्हरी सुरु होईल.
नवीन CB350 ला कंपनीने या सेगमेंटनुसार रेट्रो-मॉर्डन लूक दिला आहे. कंपनी मागील सीबी सीरिज मॉडेलच्या अगदी जवळ आहे. या बाईकमध्ये मस्कूलर फ्युअल टँक, स्टाईलिश ऑल-LED लायटिंग सिस्टम, राऊंड शेप एलईडी हँडलँप, एलईडी विंकर्स आणि एलईडी टेल लँप देण्यात आले आहे. रेट्रो क्लासिक्स लूकसह एकूण 5 रंगात ही बाईक उपलब्ध होईल. प्रेशियस रेड मेटॅलिक, पर्ल इग्नियस ब्लॅक, मॅट क्रस्ट मेटॅलिक, मॅट मार्शल ग्रीन मेटॅलिक आणि मॅट ड्यून ब्राऊन या रंगात ही बाईक उपलब्ध आहे.
इंजिन आणि परफॉर्मेंस
Honda CB 350 मध्ये कंपनीने 348.36 सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. 5500 RPM वर 20.8 bhp ची पॉवर जनरेट करते. तर 3000 RPM वर 29.4 चा पीक टॉर्क जेनरेट करते. या बाईकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.