नवी दिल्ली | 1 ऑक्टोबर 2023 : जर्मनीची कार उत्पादक ब्रँड फोक्सवॅगन समूह झेक प्रजासत्ताकच्या स्कोडा कंपनीचा (Skoda Auto) मालक आहे. ही कंपनी आता भारतीय बाजाराकडे त्यांची कार दामटणार आहे. भारतीय कार बाजारात ( Indian automotive market) ही कंपनी कारच नाही तर बाईक ही उतरवणार आहे. टेस्ला भारतात तंबू ठोकण्याच्या तयारीत आहे. भारत हा भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनांची मोठी बाजारपेठ होण्याची शक्यता आहे. येथून पुढे पूर्वेकडे व्यवसाय वृद्धीसाठी मोठी संधी एलॉन मस्क याला खुणावत आहे. त्यासाठी टेस्लाने वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. पण त्यापूर्वीच स्कोडा या भारतीय इलेक्ट्रिक बाजारात (electric vehicle) निर्णायक भूमिकेत असण्याची दाट शक्यता आहे. काय आहे या कंपनीचा प्लॅन
कंपनीला झाली घाई
टेस्लापूर्वीच भारताच्या इलेक्ट्रिक कार बाजारात एंट्री मारण्याची तयारी स्कोडाने सुरु केली आहे. भारतीय बाजारात किफायतशीर आणि अत्याधुनिक फीचर्ससह कार उतरविण्यासाठी कंपनीच अधीर झाली आहे. त्यासाठीची तयारी कंपनीने पूर्ण केल्याचे कळते. त्यामुळे ग्राहकांना खऱ्या अर्थाने लॉटरी लागणार आहे. कंपनीच्या विक्री आणि विपणन मंडळाचे सदस्य मार्टिन जान्ह यांनी भूमिका स्पष्ट केली. सध्या प्रीमियम कार Enyaq बाजारात दाखल होईल. ही कार BEVवर आधारीत असेल. पण भारतीयांना यापेक्षा अधिक किफायतशीर कार देण्याची गरज कंपनीने ओळखल्याचे त्यांनी सांगितले.
स्कोडासमोर टेस्लापेक्षा इतर भारतीय कंपन्यांचे पण आवाहन आहे. टाटा मोटर्स, महिंद्रा, मारुती सुझुकी, किया यासह इतर अनेक कंपन्या इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल झाल्या आहेत. आता खरी स्पर्धा होईल ती अत्याधुनिक फीचर्ससह किंमतीवर. जी कंपनी या स्पर्धेत खरी उतरेल, त्यावर ग्राहक फिदा होतील. त्या कंपन्यांची चलती राहील, हे स्पष्ट आहे.
किती असेल किंमत
अजून भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये तीव्र स्पर्धेचे युग आलेले नाही. पण स्कोडा पाठोपाठ टेस्ला उतरली तर भारतीय कंपन्यांना रणनीतीसह या बाजारात उतरतील. या गळेकापू स्पर्धेत टिकाव लागण्यासाठी ऑफर्सचा भडीमार आणि फीचर्सचे दुकान उघडून बसावे लागणार आहे. टेस्ला भारतीय बाजारात 20 लाख रुपयांत इलेक्ट्रिक कार आणण्याच्या विचारात आहे. स्कोडा पण याच किंमतीच्या जवळपास इलेक्ट्रिक कार उतरविण्याची शक्यता आहे.