सेमीकंडक्टरची कमतरता आणि सप्लाय चेनच्या विविध आव्हानांमुळे, एप्रिल महिन्यात बहुतांश वाहन कंपन्यांच्या कार विक्रीत घट झालेली आहे. भारतीय पॅसेंजर कार (Passenger car) मार्केटमध्ये पहिल्या क्रमांकावरील मारुती सुझुकी किंवा ह्युंदाई आणि होंडा कार्स इंडिया (Honda Cars India) सारख्या कंपन्यांनी एप्रिलमध्ये कारच्या विक्रीत घट नोंदवली आहे. दरम्यान, या सर्वांमध्ये टाटा मोटर्सने (Tata Motors) मात्र बाजारातील ट्रेंडला मागे टाकले असून गेल्या महिन्यात कंपनीच्या कारच्या विक्रीत तब्बल 66 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
देशातील सर्वात मोठी प्रवासी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने सांगितले, की गेल्या महिन्यात त्याची विक्री 5.6 टक्क्यांनी घटली आहे. कंपनीने एप्रिल 2021 मध्ये 1,59,691 प्रवासी कार विकल्या. एप्रिल 2022 मध्ये हा आकडा 1,50,661 युनिट्सवर आला आहे. एप्रिल 2022 मधील विक्रीचा आकडा देखील एका महिन्यापूर्वी म्हणजेच मार्च 2022 च्या तुलनेत 11.2 टक्के कमी झाला आहे.
या कालावधीत मारुती सुझुकीची निर्यात 6.8 टक्क्यांनी वाढून 18,413 युनिट्सवर पोहोचली आहे. मिनी आणि कॉम्पॅक्ट वाहन विभागातील विक्री 21.6 टक्क्यांनी घसरून 76,321 युनिट्सवर आली आहे. दुसरीकडे, युटिलिटी वाहनांची विक्री 33.18 टक्क्यांनी वाढून 33,941 युनिट्सवर पोहोचली आहे. चिपच्या कमतरतेमुळे त्याच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, हा प्रभाव मर्यादित असल्याचेही कंपनीचे म्हणणे आहे.
मारुती सुझुकीप्रमाणे, ह्युंडाईच्या विक्रीतही एप्रिल 2022 मध्ये घट झाली. कंपनीने गेल्या महिन्यात 56,201 युनिट्सची विक्री केली, जी एप्रिल 2021 मध्ये 59,203 युनिट्सच्या विक्रीपेक्षा 5 टक्के कमी आहे. या कालावधीत कंपनीची निर्यात 19.6 टक्क्यांनी वाढून 12,200 युनिट्सवर गेली आहे. त्याचप्रमाणे होंडाच्या कारची विक्री वर्षभरात 13.2 टक्क्यांनी घसरली.
दुसरीकडे, टाटा मोटर्सने एप्रिल 2022 मध्ये चांगली कामगिरी केली आहे. टाटा मोटर्सच्या एकूण वाहन विक्रीत एप्रिलमध्ये वार्षिक 73 टक्के वाढ झाली आणि तिचा आकडा 72,468 युनिट्सवर पोहोचला. प्रवासी वाहनांच्या बाबतीत, टाटा मोटर्सची विक्री मागील वर्षीच्या तुलनेत 66 टक्क्यांनी वाढून 41,587 युनिट्सवर गेली आहे. कंपनीने कमर्शिअल व्हेइकल सेगमेंटमध्येही मोठा नफा कमावला आहे. एप्रिल 2022 मध्ये टाटा मोटर्सने या सेगमेंटमध्ये 30,838 वाहने विकली. हे एका वर्षापूर्वी म्हणजेच एप्रिल 2021 मध्ये झालेल्या 16,515 युनिटच्या विक्रीपेक्षा 87 टक्के अधिक आहे.