मुंबई : फेब्रुवारी 2021 हा महिना भारतीय दुचाकी उद्योगासाठी चांगला ठरला आहे, कारण गेल्या महिन्यात बहुतेक बाईक उत्पादकांनी विक्रीच्या बाबतीत सकारात्मक वाढ नोंदविली. हिरो मोटोकॉर्पच्या स्प्लेंडरने उद्योगातील वर्चस्व कायम राखण्यात यश मिळविले कारण गेल्या महिन्यात कंपनीने 2,47,422 युनिट्सची विक्री केली होती, जी मागील वर्षी याच महिन्यात विकल्या गेलेल्या युनिटपेक्षा 14% जास्त आहे. हिरोने फेब्रुवारी 2020 मध्ये 2,15,196 वाहनांची विक्री केली होती. (Top 10 most selling bikes in India in February – Hero Splendor Continues To Remain Top-Ranked)
या यादीत दुसर्या क्रमांकावर हिरो कंपनीची एचएफ डिलक्स ही बाईक आहे. कंपनीने गेल्या महिन्यात बाईकच्या 1,26,309 युनिट्सची विक्री केली आहे. फेब्रुवारी 2020 च्या तुलनेत एचएफ डिलक्सच्या विक्रीत सुमारे 28% घट झाली आहे. यादीतील तिसरे स्थान होंडा सीबी शाइन मोटरसायकलने पटकावले आहे. ही बाईक प्रीमियम कम्यूटर सेगमेंटमध्ये लोकप्रिय आहे. गेल्या महिन्यात सीबी शाईनच्या 1,15,970 युनिट्सची विक्री करण्यात कंपनीला यश आले. कंपनीने फेब्रुवारी 2020 मध्ये सीबी शाईनच्या 50,825 युनिट्सची विक्री केली होती.
चौथ्या क्रमांकावर बजाज पल्सर ही बाईक असून गेल्या महिन्यात कंपनीने पल्सरची 81,454 वाहने विकली आहेत. वर्षभरापूर्वी याच महिन्यात कंपनीने पल्सर बाईकच्या 75,669 वाहनांची विक्री केली होती. पुणे स्थित मोटारसायकल उत्पादक कंपनीच्या विक्रीत लक्षणीय वाढ नोंदवली आहे. पल्सरनंतर प्लॅटिनाचा नंबर लागतो. ही एक एंट्री-लेव्हल कम्यूटर बाईक आहे. कंपनीने गेल्या महिन्यात प्लॅटिनाच्या 46,264 युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने प्लॅटिनाच्या 33,799 युनिट्सची विक्री केली होती.
सहाव्या क्रमांकावर रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ही बाईक आहे. कंपनीने या बाईकच्या 36,025 युनिट्सची विक्री केली आहे. रॉयल एनफिल्डनंतर हिरो पॅशन या बाईकचा नंबर लागतो. कंपनीने या बाईकच्या 34,417 युनिट्सची विक्री केली आहे. तर पॅशननंतर टीव्हीएस अपाचे या बाईकचा नंबर लागतो. कंपनीने फेब्रुवारी 2021 मध्ये अपाचे या बाईकच्या 31,735 युनिट्सची विक्री केली आहे. या यादीत नववं आणि दहावं स्थान हिरो ग्लॅमर आणि होंडा युनिकॉर्न या मोटारसायकलींनी पटकावलं आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये कंपन्यांनी या मोटारसायकलींच्या अनुक्रमे 27,375 आणि 22,281 युनिट्सची विक्री केली आहे.
संबंधित बातम्या
‘या’ आहेत देशातील टॉप 10 टू व्हीलर कंपन्या, विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर
Maruti, Hyundai, Bajaj Auto ची फेब्रुवारीत रेकॉर्डब्रेक विक्री, वाहन कंपन्यांचा Sales Report जारी